नारायण राणे म्हणजे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी, शिवसेनेच्या नेत्याचा सणसणीत टोला

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणावरून भाजपचे नेते नारायण राणे यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर हल्लाबोल करत टीका केली होती. या टीकेला शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले आहे. भाजपमध्ये दाखल झालेले नारायण राणे यांना आता कोणतेही काम उरलेले नाही. त्यांच्या पक्षातही त्यांना काही काम दिले जात नाही. त्यामुळे ते एक सुशिक्षित बेरोजगार राजकारणी असल्याचा सणसणीत टोला त्यांनी लगावला आहे.

काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी नाणार प्रकल्पावरूनही शिवसेनेवर टीका केली होती. नाणार प्रकल्प हा शिवसेनेच्या कमाविण्याचे साधन आहे, अशी टीका राणेंनी केली होती. यावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गुलाबराव पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर पलटवार करत टोला लगावला आहे. नारायण राणे हे शिवसेनेत असताना मुख्यमंत्री होते. शिवसेनेनं त्यांना खूप काही दिले आहे. पण, त्यांनी कोकणासाठी काहीही केले नाही. त्यामुळे त्यांनी कोकणासाठी कुणी काय केले यावर बोलूच नये, निव्वळ प्रसिद्धीसाठी ते वक्तव्य करत असतात, असा टोला पाटलांनी लगावला.

बेळगावमध्ये कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला आहे. कर्नाटक सरकारच्या या कृत्याचा निषेध करताना गुलाबराव पाटील म्हणाले, शिवाजी महाराजांचा पुतळा दूर केला पण मनातून ते दूर करु शकत नाहीत. शिवाजी महाराजांचा पुतळा हलवून त्यांनी स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. छत्रपती दिल्लीला जाऊन जर समोरच्याला नतमस्तक करायला लावतात तर कर्नाटक किस खेत की मुली है, अशा शब्दात त्यांनी कर्नाटक सरकारवर टीकास्त्र सोडले.