नारायण राणे आगामी 10 दिवसात घेणार ‘या’ संदर्भात मोठा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील अनेक नेते युतीमध्ये पक्षांतर करत आहेत. अशातच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी राजकीय वाटचालीविषयी 10 दिवसांत निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले आहे. मी माझ्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात राहणार की भाजपमध्ये जाणार याचा निर्णय येत्या 10 दिवसांत घेणार आहे. असं विधान त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केलं आहे. येत्या दहा दिवसात नारायण राणे काय निर्णय घेतात. याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काँग्रेस सोडल्यापासून नारायण राणे भाजप प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. भाजपकडून त्यांना राज्यसभेत खासदारकीही देण्यात आली आहे. मात्र अद्याप त्यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश झाला नाही. भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडून नारायण राणे यांच्या पक्षप्रवेशाला परवानगी मिळाली आहे. मात्र राज्यातील राजकीय समीकरणं पाहून मुख्यमंत्र्यांनी अद्याप राणेंच्या भाजप प्रवेशाला होकार दिलेला नाही.

नारायण राणे म्हणाले की, ‘मी भाजपमध्ये राहणार की माझ्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात राहणार हे येत्या दहा दिवसात स्पष्ट होईल. भाजपने दिलेल्या आश्वासनांची अद्याप पूर्तता केलेली नाही. भाजपप्रवेश व्हावा यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच प्रयत्न करत आहेत. येत्या चार-पाच दिवसात मुख्यमंत्री याबाबत निर्णय कळवणार आहेत. त्यानंतर मी माझा निर्णय जाहीर करणार आहे. ‘

काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर राणेंनी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न केले. युतीमधील काही नेत्यांच्या विरोधामुळे त्यांचा भाजपप्रवेश अद्याप रखडलेलाच आहे.

आरोग्यविषयक वृत्त –