माघार घेणे हा आपला पिंड नाही, आपल्यावर कोणाचाही दबाव नाही : नारायण राणे

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या कोकणात यावेळी अटीतटीची लढत होणार आहे. आपला बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी शिवसेनेला मोठे आव्हान पेलावावे लागणार आहे. नारायण राणे यांनी आपले पुत्र निलेश राणे यांना महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून सिंधुदुर्ग-रत्नागिरीमधून लोकसभेचे उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे आता सिंधुदुर्ग-रत्नागिरी लढत रंगणार आहे.

नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष एनडीएचा घटक पक्ष आहे. तसेच नारायण राणे भाजपचे सहयोगी खासदार आहेत. मात्र असं असतानाही नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग-रत्नागिरी येथून निलेश राणे यांना उमेदवारी दिली आहे. भाजप-शिवसेनेची युती झाल्याने राणे यांनी निवडणूक लढवू नये यासाठी भाजप नेतृत्त्वाकडून दबाव येत असल्याच्या चर्चा होत्या. परंतु याबाबत नारायण राणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

नारायण राणे म्हणाले की, “माझ्यावर कुणीही दबाव आणू शकत नाही. मी पूर्ण विचार करुन निलेश राणे यांना उमेदवारी दिली आहे. काहीही झालं तरी निलेश राणे निवडणूक लढणार, उमेदवारी मागे घेणं हे माझं पिंड नाही. भाजपच्या कोणत्याही नेत्याने माझ्याशी संवाद साधलेला नाही. तसेच २९ मार्चला निवडणुकीचा फॉर्म भरणार आहे” असेही नारायण राणे यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत स्वबळावर लढणार असल्याची घोषणा नारायण राणे यांनी आधीच केली होती. इतकेच नाही तर, लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर आपण भाजपसोबत जाणार आहोत अशी भूमिकाही राणेंनी आधीच स्पष्ट केली आहे. निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि भाजप गटाला मतदान करणार असल्याचंही नारायण राणेंनी यापूर्वीच जाहीर केलं होतं.