नारायण राणे – राजन तेली 5 वर्षांनी पुन्हा येणार ‘एकत्र’

सावंतवाडी : पोलीसनामा ऑनलाइन – एकेकाळी कट्टर समर्थक असलेले व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे उजवे हात मानले जाणारे माजी आमदार राजन तेली यांच्यासाठी नारायण राणे हे आज सावंतवाडीला येत आहे. माजी आमदार राजन तेली यांनी ५ वर्षांपूर्वी राणे यांच्याशी फारकत घेत भाजपामध्ये प्रवेश केला होता.

सध्या राजन तेली हे शिवसेनेचे उमेदवार व गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याविरोधात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणुक लढवत आहेत. कोकणात अनेक ठिकाणी शिवसेना व भाजप हे आमने सामने आले आहेत.

तेली यांना भाजपाचा पाठिंबा आहे. दीपक केसरकर आणि नारायण राणे यांच्यात विळ्या भोपळ्याचे नाते सर्वांना माहिती आहे. जेथे जेथे केसरकर यांना विरोध करता येईल, तेथे तेथे राणे यांनी त्यांना विरोध केला आहे. त्यामुळे राजन तेली हे त्यांच्याविरोधात उभे राहिल्यानंतर त्यांच्या प्रचारासाठी नारायण राणे हे आज गुरुवारी दुपारी अडीच वाजता सावंतवाडीत येत आहेत. राजकारणात शत्रुचा शत्रु हा मित्र या न्यायाने राणे आणि तेली यांचे राजकीय संबंध तब्बल ५ वर्षांनंतर जुळले असून ते प्रथमच एकत्र येत आहेत.

visit : policenama.com