राणे, राऊत, सुप्रिया सुळे यांची संसदेत ‘चाय पे चर्चा’, म्हणाले ‘जय महाराष्ट्र’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नारायण राणे हे जरी पक्षांतर करत भाजपात दाखल झाले असले आणि शिवसेनेशी त्यांचा असलेला विस्तव कायम असला तरी राणेंचे शिवसेनेच्या नेत्यांशी वैयक्तिक संबंध चांगले असल्याचे पुन्हा एकदा पाहायला मिळेल. नारायण राणे, सुप्रिया सुळे, संजय राऊत यांनी संसद भवनात एकत्र बसून चहाचा आस्वाद लुटला. यावेळी त्यांनी चर्चा देखील केली. परंतु ही चर्चा कोणत्या विषयांवर झाली याचा तपशील समोर आला नाही. परंतु राणे-राऊत एकत्र दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक फोटो शेअर केला ज्यात स्वत: सुप्रिया सुळे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि भाजप नेते नारायण राणे दिसत आहेत. या फोटोमध्ये समोरील टेबलवर आणि राऊत यांच्या हातात चहाचा कप दिसत आहे. सर्व नेत्यांच्या चेहऱ्यावर हस्य दिसत आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादीची राज्यात सत्ता असल्याने ते एकत्र असणे स्वाभाविक आहे परंतु या नेत्यांसह भाजपचे नेते नारायण राणे असणे हे सर्वांसाठी आश्चर्याचे आहे. शिवसेनेवर आग पाखड करणारे राणे-राऊत आणि सावंत यांच्यासोबत चहा घेताना दिसत आहे. या एकत्र येण्यामागे काही राजकीय कारण आहे का, त्याचे त्यांच्या भविष्यावर काय परिणाम होणार असे विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.

सुप्रिया सुळे यांनी हा फोटो ट्विट करत जय महाराष्ट्र असे लिहिले आहे, यातून त्यांनी महाराष्ट्रातील नेते दिल्लीत एकसंघ असल्याचा संदेश त्यांनी खुबीने दिला आहे.

नारायण राणे भाजपात जास्त खूश नसल्याचे बोलले जात आहे. राज्यसभेतही ते अनिच्छेने गेल्याचे सांगण्यात येत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच मंत्रिमंडळात त्यांना महत्वाचं मंत्रिपद हवं होतं, परंतु त्या ऐवजी त्यांना दिल्लीत जावे लागल्याने ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिवसेना नेत्यांबरोबर राणेंची झालेली ‘चाय पे चर्चा’ चर्चेचा विषय बनली आहे.