नारायण राणेंचा गौप्यस्फोट; म्हणाले – ‘अनिल देशमुखांनी CBI ला दिलेल्या जबाबात अनिल परब यांचे नाव घेतलंय’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन : गृहमंत्रिपदावर असताना अनिल देशमुख यांनी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना शंभर कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप आहे. त्यावरून आता अनिल देशमुख यांची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) चौकशी सुरु आहे. याच चौकशीदरम्यान दिलेल्या जबाबात अनिल देशमुख यांनी अनिल परब यांचे नाव घेतल्याचा गौप्यस्फोट भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी केला आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खंडणी प्रकरणात नाव घेतले होते. या आरोपावरून अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता त्यांची सीबीआयकडून चौकशी केली जात आहे. त्यावर बोलताना नारायण राणे यांनी म्हटले, की ‘अनिल देशमुखांचे खरं रूप आणि ते कुणाच्या सांगण्यावरून हे करत होते त्यांचा भांडाफोड होईल. अनिल देशमुख यांनी सीबीआयला दिलेल्या जबाबात जी नावं घेतली आहेत कायदेशीरदृष्ट्या पाहिले तर त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी अनिल परब यांचे नाव घेतले आहे. या प्रकरणात पुढचा नंबर अनिल परब यांचा असेल, असे आम्ही उगाच म्हटले नव्हते.’

अनिल परब सेवाभावी मंत्री

अनिल परब हे सेवाभावी मंत्री आहेत. अजिबात कमिशन न घेता जमा करायचे आणि आणून द्यायचे. हे त्यांचे काम आहे. सेवा आणि मेवा कसा गोळा केला आणि कुठे पोहोचवला, यासाठी ही चौकशी चालली आहे. सीबीआय चौकशीचा अहवाल 15 दिवसांच्या आत जाहीर होईल. अनिल परब हे चौकशीसाठी तयार नसतील तर त्यांना उचलून चौकशीला नेले जाईल आणि चौकशीला जाण्यापूर्वी त्यांना राजीनामा द्यावा लागेल, असेही नारायण राणे म्हणाले.