‘वाघाची शेळी-मेंढी झालीय’, नारायण राणेंचा शिवसेनेवर ‘घणाघात’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनेचा वाघ आता राहिलेला नसून, शेळ्या-मेंढ्या झाल्या आहेत असे म्हणत राज्याचे माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी आज शिवसेनेवर जोरदार टीका केली. त्याचबरोबर याप्रसंगी नारायण राणे यांनी कौटुंबिक पार्श्वभूमी, राजकारणातील प्रवेश, बाळासाहेब ठाकरे सोबतची पहिली भेट, शिवसेनेशी आलेला संबंध, बेस्टचे अध्यक्ष म्हणून केलेले काम, मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द, शिवसेनेला दिलेली सोडचिठ्ठी, अशा अनेक विषयांवर भाष्य केले. पुण्यात आयोजित सातव्या पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलमध्ये ‘युवर्स ट्रूली नारायण राणे’ कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी नारायण राणे बाळासाहेबांविषयी बोलताना बाळासाहेबांपासून दूर गेल्याचा अजूनही त्रास होतो असे म्हणत भावूक झाले. ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव पेक्षा माझ्यावर प्रेम केले. आताची शिवसेना व्यवसायिक झाली आहे असा घणाघाती प्रहार करत शिवसेनेत आम्ही जेवढी आंदोलने केली तेवढी उद्धव ठाकरेंना माहितीही नसतील असे म्हटले. तसेच माझ्या कामाची स्टाईल पाहून मनोहर जोशी आणि सुभाष देसाई यांनी माझ्याविरोधात कारस्थाने केल्याचा आरोपही त्यांनी केला.

यावेळी राणे यांनी उद्धव ठाकरेंवर वैयक्तिक निशाणा साधत, ‘शिवसेनेत दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतही मी सर्वाधिक लोकप्रिय होतो, अपवाद फक्त उद्धव ठाकरे यांचा.. त्यांना चांगले दिसत नाही आणि चांगल्या व्यक्तीचे कौतुकही करवत नाही असेही म्हटले.’ उद्धव ठाकरे सोडल्यास सर्वपक्षीयांशी माझे चांगले संबंध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बाळासाहेब ठाकरे होते, तोपर्यंत शिवसेना ही शिवसेना होती. पण, आता शिवसेनेच्या आमदारांमध्ये वैचारिक नीतिमत्ता उरलेली नाही. मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होत असताना महापालिकेत टक्केवारी घेऊन कामे केली जात आहेत. पैसे देऊन आमदार, महापौर, नगरसेवक होता येते, हे शिवसैनिकांनाही आता माहिती आहे.

काँग्रेस सोडण्याविषयी विचारले असता, काँग्रेसमध्ये पक्षासाठी काही करावे अशी नीतिमत्ता उरलेली नाही असे म्हणत भाजपमध्ये प्रवेशासाठी शिवसेनाच आडकाठी आणत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like