भाजपकडून पुन्हा एकदा नारायण राणेंना ‘हुलकावणी’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार नारायण राणेंना पुन्हा धक्का बसला असून त्यांचा आजचा भाजप प्रवेश रद्द करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या उपस्थितीत आज राणेंचा प्रवेश होण्याची चर्चा होती. मात्र नारायण राणेंबद्दल लवकरच निर्णय घेतला जाईल असे म्हणत फडणीस यांनी त्यांचा पक्षप्रवेश पुन्हा लांबवला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील अनेक नेते युतीमध्ये पक्षांतर करत आहेत. मात्र नारायण राणे यांचा पक्षप्रवेश अद्याप रखडलेलाच आहे. नारायण राणे यांना पक्षात घेण्याचा प्रश्नच येत नाही. ते आमचेच खासदार आहेत. भाजपाच्या कोटयातून ते खासदार झाले आहेत असे विधान काही दिवसापूर्वी फडणवीस यांनी केले होते.

काँग्रेस सोडल्यापासून नारायण राणे भाजप प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. भाजपकडून त्यांना राज्यसभेत खासदारकीही देण्यात आली आहे. मात्र अद्याप त्यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश झाला नाही. भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडून नारायण राणे यांच्या पक्षप्रवेशाला परवानगी मिळाली आहे. मात्र राज्यातील राजकीय समीकरणं पाहून त्यांचा पक्षप्रवेश लांबविला जात आहे. राणेंच्या भाजप प्रवेशाला शिवसेनेचा विरोध आहे.

Visit – policenama.com