शरद पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्या बैठकीबद्दल नारायण राणेंचा मोठा खुलासा, म्हणाले…

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन –  एकीकडे राज्यातील कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या वाढत असताना विरोधकांकडून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी जोर धरत आहे. सोमवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर रात्री ‘मातोश्री’वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत गुप्त बैठक झाली. मात्र, भाजपचे खासदार नारायण राणे यांनी, अशी कोणतीही बैठक झालीच नसल्याचा दावा केला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सोमवारी संध्याकाळी ‘मातोश्री’वरती गेलेच नसून, त्यांची उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासोबत कोणतीही बैठक झाली नाही, असा दावा नारायण राणे यांनी केला. तसेच महविकास आघाडीचे सरकार हे ५ वर्ष टिकणार नाही. ‘काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना आपल्या मंत्रिपदाची चिंता आहे. त्यामुळे ते सरकार टिकेल असं म्हणत आहे. असा टोला देखील राणे यांनी थोरातांना लगावला.

दरम्यान, नारायण राणे यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत राज्यातील सरकार कोरोना संसर्गाची स्थिती हाताळण्यास अपयशी ठरल्याचा आरोप करत, त्यांच्याकडे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. आणि महापालिकेची सर्व रुग्णालये ताब्यात घेण्यात यावे, अशी मागणी केली होती.

विरोधकांनी तात्काळ क्वारंटाईन व्हावे – संजय राऊत

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत भाजपाला टोला लगावला आहे. ‘कोरोनावर लस आणि ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचा आहे. संशोधन जारी है. विरोधकांनी तात्काळ क्वारंटाईन व्हावे हेच बरे’ तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. ‘पण महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील’ असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

त्यापूर्वी संजय राऊत यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीबाबत ट्विट केलं होत. ‘शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सोमवारी संध्याकाळी ‘मातोश्री’ वर भेट झाली. दोन नेत्यांमध्ये दीड तास चर्चा झाली. कुणी सरकारच्या स्थिरते बाबत बातम्यांचा धुरळा उडवीत असतील तर ती निव्वळ पोटदुखी समजावी. सरकार मजबूत आहे. चिंता नसावी’ असं देखील त्यांनी म्हटलं.