काँग्रेसची मोदी सरकारवर खरमरीत टीका, म्हणाले – ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आता ‘नमो कंट्रोल्ड ब्युरो’ झाला आहे का ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. त्यातच दुसरीकडे, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अमली पदार्थांची चौकशी करत आहे. यामध्ये अनेक मोठ्या बॉलिवूड कलाकारांची नावे समोर आली आहे. अशातच या प्रकरणाशी संबंधित असलेल्या भारतीय जनता पार्टी-बॉलिवूड-सँडलवुड-गोवा कनेक्शनची चौकशी एनसीबी का करत नाही, हा नार्कोटिक्स कंट्रोल आता “नमो कंट्रोल्ड ब्युरो’ झाला आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस नेते व प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.

सचिन सावंत म्हणाले, भाजपचे बॉलिवूड मधील ड्रग्ज कनेक्शन, सँडलवूड आणि गोवा प्रकरणाकडे नरेंद्र मोदी यांची प्रिय व्यक्ती राकेश अस्थाना महासंचालक असलेल्या एनसीबीला दुर्लक्ष करुन देणार नाही. एका ५९ ग्रॅम गांजाप्रकरणी एनसीबी एवढा मोठा गाजावाजा करत आहे. मात्र, त्याचवेळी कर्नाटकात भाजपचा कार्यकर्ता चंद्रकांत चौहानला १२०० किलो गांजासोबत अटक करण्यात आली. त्याकडे त्यांनी ढुंकूनही पहिले नाही. सँडल वुड ड्रग्ज प्रकरणी कर्नाटकातील अभिनेत्री रागिनी द्विवेदी हिच्यासह १२ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ती भाजपाची कर्नाटक स्टार प्रचारक आहे. तसेच यात आदित्य अल्वा या व्यक्तीला अटक केली आहे. तो गुजरात भाजप स्टार आणि मोदी बायोपिक सहनिर्माता आणि मोदींची भूमिका साकारणारा विवेक ओबेरॉयचा सख्खा मेव्हणा आहे.

गुजरात राज्य सरकारने चित्रपट निर्माता संदीपसिंह व विवेकच्या कंपनीसोबत १७७ कोटी रुपयांचा सामंजस्य करार केला होता. मोदी बायोपिकचे पोस्टर रिलीज हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत केले होते. याच संदीप सिंहने भाजप कार्यालयात फोन केले होते आणि त्याला मॅरिशयसमध्ये एका प्रकरणात कोणी मदत केली होती याचा खुलासा अजून झाला नाही. हे सर्व एकमेकांशी संबंधित आहे. महाराष्ट्र सरकारने या संबंधाची माहिती सीबीआयला दिली आहे. मात्र, आजतागायत या अँगलचा तपास करण्यात आला नाही, याचे आश्चर्य वाटते. एनसीबी ड्रग कनेक्शनची पाळंमुळं शोधत असताना गौरव आर्याचे भागीदार कोण आहेत आणि गोवा अँगल या तपासातून गायब झालेला दिसत आहे. याचे उत्तर एनसीबीने दिले पाहिजे.

कंगनाला चौकशीसाठी का बोलावले नाही

कंगनाने स्वतः आपण ड्रग्ज घेत होतो असे कबूल आहे. कंगनाचा ड्रग्ज व्हिडीओ याबबाबत पुरावा आहे, पण तिची चौकशी केली जात नाही. ही चौकशी सुरु असताना कंगना मुंबईत येऊन काही दिवस राहून परत सिमल्याला गेली पण चौकशीला तिला बोलावले नाही ? एनसीबी कंगनावर मेहरबान आहे का ? का कंगना बॉलिवूडचा भाग नाही ? एनसीबी व्हॉट्सअप चॅट वरुन चौकशीसाठी बोलवत असेल तर कंगनाच्या व्हिडिओकडे डोळेझाक का ? असा प्रश्न सावंत यांनी विचारला.