दाभोळकर खून प्रकरणातील तिघा आरोपींना जामीन मंजूर 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातील तिन्ही आरोपींना जमीन मंजूर झाला आहे. अमोल काळे, राजेश बंगेरा आणि अमित दिगवेकर यांच्याविरोधात ९० दिवसात आरोपपत्र दाखल न केल्यामुळे तसेच मुदतवाढीसाठी अर्जही न दिल्याने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. ए. सय्यद यांनी हा निकाल दिला. आज पुण्यातील सत्र न्यायालयात आरोपींच्या जामीनावर सुनावणी झाली.

आरोपपत्र दाखल न झाल्यामुळे जामीन 
बंगेरा आणि दिगवेकर यांना अटक होऊन १०१ दिवस तर अमोल काळेला अटक होऊन ९६ दिवसांचा कालावधी झाला होता. याप्रकरणात सीबीआयने बेकायदेशीर प्रतिबंधक हालचाली अन्वये कलम वाढ केली आहे. त्यामुळे दाभोलकरांचे मारेकरी असलेले आरोपी सचिन अंदुरे व शरद कळसकर यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी सीबीआयने यापूर्वीच ४५ दिवसांची मुदतवाढ मिळवली होती. परंतु, काळे, बंगेरा आणि दिगवेकर यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी सीबीआयने वेळेत मुदत वाढीचा अर्ज दाखल न केल्याने न्यायालयाने त्या तिघांना जामीन मंजूर केला. ९० दिवसांचा कालवधी उलटून गेल्याने तिघांना जामीन मिळण्याचा अधिकार असल्याने बुधवारी अ‍ॅड. धर्मराज चंडेल यांनी अर्ज दाखल केला होता.

नरेंद्र दाभोलकर हत्येचा तपास सध्या महत्वाच्या पातळीवर आहे. अशावेळी सीबीआयने  तिघा आरोपींच्या विरोधात मुदत वाढीचा अर्ज वेळेत दाखल केला नाही. त्यामुळे त्यांना जामीन मिळाल्याने सीबीआयवर नामुष्कीची वेळ आली आहे. दाभोळकर खून प्रकरणातील तिघांपैकी दोघेजन गौरी लंकेश हत्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत. कर्नाटकच्या विशेष पथकाकडून (एसआयटी) त्यांची चौकशी सुरू आहे. तर अमोल काळे हा कॉ. गोविंद पानसरे यांच्या खून प्रकरणी विशेष तपास पथकाच्या ताब्यात आहे.