डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयितांचे जामीन अर्ज पुन्हा फेटाळले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी डॉ. विरेंद्रसिंह तावडे आणि विक्रम भावे यांनी दाखल केलेला जामीन अर्ज विशेष न्यायालयाने पुन्हा फेटाळले आहेत. ॲड. पुनाळेकर आणि भावे यांच्या विरोधात पुरवणी दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे. त्यामुळे आरोपींना पुन्हा एकदा जामिनासाठी अर्ज करण्याचा अधिकार असल्याने त्याने जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. अशी माहिती डॉ. तावडे आणि भावे यांचे वकील समीर पटवर्धन यांनी दिली.

या प्रकरणात जामीन मिळावा म्हणून डॉ. तावडे याने तिसऱ्यांदा तर, भावे याने दुसऱ्यांदा अर्ज केला होता. डॉ. विरेंद्रसिंह तावडे हाच डॉ. दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येमागील मास्टरमाइंड आहे, असा दावा सीबीआयकडून करण्यात आला आहे. शरद कळसकर याला ॲड. संजीव पुनाळेकर यांनी गुन्ह्यातील शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता. तर विक्रम भावे याने कळसकर आणि सचिन अंदुरेसह घटनास्थळाची रेकी केल्याचे सीबीआयने दाखल केलेल्या दोषारोपत्रातून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, डॉ. तावडे यांनी वृद्ध वडिलांना भेटण्याची परवानगी मिळावी, असा अर्ज विशेष न्यायालयात सादर केला होता. न्यायालयाने पोलिसांच्या बंदोबस्तात डॉ. तावडे यांना वडिलांना भेटण्याची परवानगी दिली आहे.

कळसकर याने पत्रकार गौरी लंकेश याच्या खून प्रकरणातील तपासात दिलेल्या कबुली जबाबावरुन ॲड. पुनाळेकर आणि भावे यांना मे 2019 मध्ये अटक करण्यात आली होती. ॲड. पुनाळेकर यांना जामीन देण्यात आला आहे. तर भावे अद्याप न्यायालयीन कोठडीत आहे. 3 सप्टेंबर 2016 रोजी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे व त्यानंतर 19 फेब्रुवारी 2019 रोजी कळसकर व अंदुरे यांच्याविरोधात दुसरे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.