‘व्हॅक्सीन’ घेऊन जगभरात जाणारी विमानं रिकामी येत नाहीत, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक देशांनी व्हॅक्सीनचे उत्पादन सुरु केले आहे. भारताने देखील कोरोना व्हॅक्सीनचे उत्पादन सुरु केले असून जगभरातील अनेक देशांना भारतात तयार होणारे व्हॅक्सीन पाठवले जात आहे. जी विमानं व्हॅक्सीनचे लाखो डोस घेऊन जगभरात जात आहेत, ती रिकामी येत नाहीत. ते आपल्या सोबतीने भारताप्रति विश्वास आत्मीयता, स्नेह, आशीर्वाद आणि एक भावनात्मकता घेऊन येत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. बजेटमधील डीपीआयआयटीशी संबंधित घोषणा संदर्भात एका वेबिनारमध्ये बोलत होते.

भारतातील तृणधान्यही व्हॅक्सीनप्रमाणे महत्त्वाचे

संयुक्त राष्ट्रांकडून 2013 हे ‘international Year of Millets 2023’ अशी घोषणा केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी आभार मानले आहेत. ते म्हणाले, भारताच्या या प्रस्तावाचे 70 हून अधिक देशांनी समर्थन केले आहे. आपण योगाला ज्या पद्धतीने संपूर्ण जगभर पसरवले त्याच पद्धतीने आपण सर्वजण एकत्रितपणे तृणधान्यही (भरड) संपूर्ण जगात पोहोचवू शकतो. ज्या पद्धतीने कोरोनापासून वाचण्यासाठी मेड इन इंडिया व्हॅक्सीन आहे. त्याच पद्धतीने लोकांना आजारी पडण्यापासून वाचण्यावण्यासाठी भारतात तयार होणारे तृणधान्य महत्त्वाचे असल्याचे मोदींनी सांगितले.

PLI स्किमच्या सहायाने उत्पादन वाढण्याची शक्यता

पंतप्रधान मोदी म्हणाले, या वर्षीच्या अर्थसंकल्पात PLI स्किमशी संबंधीत योजनांसाठी जवळपास 2 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. उत्पन्नाच्या सरासरी 5 टक्के इंसेंटिव्हच्या स्वरुपात देण्यात आले आहेत केवळ PLI स्किमच्या सहाय्याने येत्या पाच वर्षात जवळपास 520 बिलियन डॉलरचे उत्पादन भारतात होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

लसीबाबत दिल्ली उच्च न्यायालयाकडून केंद्राला विचारणा

दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने देशातील नागरिकांना लस मिळत नसताना इतर देशांना तुम्ही लस का देता. लसनिर्मितीच्या क्षमतेचा पूर्णपणे वापर का करत नाही, असा सवाल सीरम आणि भारत बायोटेकला विचारला आहे. तसेच कोरोना लसीकरणासाठी वर्गीकरण करण्यामागचे नेमके कारण काय, असा सवाल केंद्र सरकारला विचारण्यात आला आहे.