नवीन मंत्रिमंडळासाठी मोदी-शाह यांच्यात ५ तास चर्चा ; नवीन चेहऱ्यांचा विचार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपप्रणीत आघाडीला घवघवीत यश मिळाल्यानंतर आता सर्वांच्या नजरा नवीन मंत्रिमंडळाच्या शपथविधीकडे लागल्या आहेत. मंत्रीमंडळात कोणाला स्थान मिळणार आणि कोणाला बाहेरचा रास्ता दाखविला जाणार याकडेच सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान राष्ट्रपती भवनात गुरुवारी होणाऱ्या भव्य शपथविधी सोहळयाआधी नवीन मंत्रिमंडळातील सदस्यांची नावं निश्चित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यामध्ये तब्बल पाच तास चर्चा झाली. एका वृत्तवाहिनेने या संदर्भात वृत्त दिले आहे. अमित शाह यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल अशी चर्चा आहे.

भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांना मंत्रिमंडळात घेतल्यास पक्ष संघटना मजूबत राहणार नाही असे भाजपाच्या जेष्ठ नेत्यांचे मत आहे. शाह यांचे संघटन कौशल्य सर्वांना परिचित असून पक्षातील तळागाळातील कार्यकर्त्यांना जोडून निवडणूक रणनिती आखण्यामध्ये शाह माहीर आहेत. अमित शाह यांना भाजपाचा चेहरा बदलून टाकण्याचे श्रेय जाते. आरोग्याच्या कारणांमुळे अरुण जेटली यांचा सुद्धा मंत्रिमंडळात समावेश केला जाणार नाही अशी चर्चा आहे. विद्यमान सरकारमध्ये ते अर्थमंत्री आहेत. अरुण जेटली यांच्या प्रकृतीसंबंधी असलेल्या अफवांवर सरकारचे प्रवक्ते सीतांशू कार यांनी टि्वटरवरुन स्पष्टीकरण दिले. काही प्रसारमाध्यमांमध्ये अरुण जेटली यांच्या प्रकृतीसंबंधी प्रसिद्ध झालेल्या वृत्तांमध्ये अजिबात तथ्य नाही असे सीतांशू कार यांनी स्पष्ट केले.

मोदींच्या शपथविधीपासून भारताने यावेळी पाकिस्तानला दूर ठेवण्यासाठी सार्क ऐवजी बीआयएमएसटीईसी देशांच्या नेत्यांना निमंत्रण दिले आहे. बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ आणि भूतान या देशांचा बीआयएमएसटीईसीमध्ये समावेश होतो.