मालदीवच्या सर्वोच्च सन्मानाने संपूर्ण भारताचा ‘सन्मान’ : पंतप्रधान नरेंद्र मोदी

माले : वृत्तसंस्था –  पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून मालदीवच्या दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांना ‘रूल ऑफ निशान इज्जुद्दीन’ हा सन्मान देण्यात आला आहे. हा परदेशी प्रतिनिधींना देण्यात येणारा मालदीवचा सर्वात मोठा नागरी सन्मान आहे. मोदींनी म्हटले की, आज मला मालदीवच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करून फक्त माझाच नव्हे तर पूर्ण भारत देशाचा सन्मान केला आहे. भारत नैसर्गिक संकटात तसेच इतर समस्यांमध्ये नेहमी मालदीव सोबत उभा राहिला आहे.

दरम्यान, मालदीवमध्ये उतरल्यानंतर नरेंद्र मोदी यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला. यानंतर नरेंद्र मोदी आणि मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्यामध्ये बैठक झाली.नरेंद्र मोदी यांनी मालदिवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांना भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंनी सही केलेली बॅट भेट दिली आहे.

भारत नेहमीच मालदिवसोबत उभा

मोदींनी म्हटले की, हिंद महासागराच्या लाटांनी आपल्याला घनिष्ठ संबंधांनी बांधलेले आहे. १९८८ चा बाहेरून झालेला हल्ला असो किंवा त्सुनामीचे संकट तसेच नुकतेच पिण्याच्या पाण्याची झालेली कमतरता, भारत नेहमीच मालदीवच्या सोबत उभा राहिला आहे. भारतमध्ये झालेल्या संसदीय आणि मालदीवमध्ये झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीनंतर हे स्पष्ट झाले आहे की, दोन्ही देश विकास आणि स्थिरता पाहू इच्छितात. अशा परिस्थितीत केंद्रित, सर्वसमावेशक विकास आणि सुशासन यांची आपली जबाबदारी महत्वपूर्ण झाली आहे.