पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्याचा नागपूर दौरा पावसामुळे रद्द

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शनिवारचा (दि.7) नागपूर दौरा मुसळधार पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. शनिवारी नागपूरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा रद्द करण्यात आला असल्याची माहिती नागपूरच्या पोलीस आयुक्तांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द झाल्याने मेट्रोचा लोकार्पण सोहळा रद्द करण्यात आला आहे.

दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी शनिवारी (दि.7) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार होते. या दौऱ्यात नागपूर येथील विकासकामांचे भूमिपूजन करणार होते. तसेच नागपूर मेट्रोचे लोकार्पण करणार होते. मात्र, खराब हवामानामुळे त्यांचा दौरा रद्द करण्यात आला असल्याचे नागपूर मेट्रोकडून सांगण्यात येत आहे. हा सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.

सध्या महाराष्ट्रात जे राजकीय वातावरण आहे त्या पार्श्वभूमीवर सगळ्यांचं लक्ष मोदी यांच्या दौऱ्याकडे लागले होते. भाजपामध्ये जोरदार इनकमिंग सुरु असून काही दिग्गज पंतप्रधानांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश करणार होते. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द झाल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूरमध्ये मेट्रोच्या ब्रॉड ग्रेड कोचच्या कारखान्याचे भूमिपूजन होणार होते. तसेच दोन महिन्यावर राज्यात विधानसभा निवडणूका असून आठवडाभरात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले होते.

Loading...
You might also like