मोदी सरकारच्या योजनांच्या नावावर फसवणूक करणाऱ्या IIT च्या विद्यार्थ्याला अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारच्या योजनांच्या नावावर फसवणूक केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने एकाला अटक केली आहे. राकेश जांगीर असे त्याचे नाव असून तो राजस्थानमधील नागौरचा रहिवासी आहे आणि तेथूनच त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीने सन २०१९ मध्ये आयआयटी कानपूर मधून पदवी घेतली आहे. मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर त्याने एक वेबसाईट बनवली आणि या बेवसाईटवर त्याने फ्री मध्ये लॅपटॉप आणि सोलर पॅनल मिळणार असल्याचे सांगत लोकांची दिशाभूल केली. यासाठी त्याने आवेदन करण्याचे आवाहन देखील केले. यासाठी ५ जून हि शेवटची तारीख असल्याचे त्याने वेबसाईटवर टाकले होते.

काय होता प्लॅन

राकेश जांगीर याने वेबसाइटवर सांगितले की, नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत २ अब्ज युवकांना मोफत लॅपटॉप्स देण्याचे सरकारने जाहीर केले आहे. आतापर्यंत ३० लाख युवकांनी यशस्वीरित्या अर्ज केला आहे, तुम्ही देखील हा अर्ज करून याचा फायदा उठवू शकता. शेवटच्या तारखेपूर्वी आपला अर्ज शक्य तितक्या लवकर भरा. त्याचबरोबर या वेबसाइटवर एक सोलर पॅनेलसेट देखील मोफत देण्याबातची माहिती देण्यात आली होती.

त्याने वेबसाइटवर माहिती दिली की ५ जून २०१९ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे आणि त्वरित हा मॅसेज आपल्या सर्व मित्रांना पाठवा जेणेकरून या योजनेचा लाभ त्यांना देखील मिळू शकेल. त्याने नागरिकांना solor-panel.sarkaari-yojana.in आणि modi-laptop.sarkaari-yojana.in url वर अर्ज करायला सांगितले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, या योजनांसाठी २ दिवसात तब्बल १५ लाख लोकांनी अर्ज केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रमेश जांगीर याने आपल्या चुलत भावाबरोबर या वेबसाइटवर ट्रॅफिक वाढवून अधिक महसूल मिळविण्यासाठी हे काम केले आहे. त्याच्याकडून महत्वाची कागदपत्रे आणि संगणक जप्त करण्यात आला आहे.