नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील ‘या’ शहरातून करणार निवडणूक प्रचाराचा शुभारंभ

वर्धा : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीचे वारे आचारसंहिता लागल्यापासून अधिकच जोरात वाहू लागले आहे. अशातच नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या जाहीर सभेचे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्धा शहरातून करणार आहेत. काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला वर्धा आता भाजपच्या ताब्यात गेला आहे. याच वर्धा मतदारसंघात नरेंद्र मोदी २८ मार्च रोजी आपली महाराष्ट्रातील पहिली जाहीर सभा घेणार आहेत.

या संदर्भात माहिती देण्यासाठी वर्धा लोकसभा मतदारसंघाचे प्रचार संयोजक सुधीर दिवे, अध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, मित्रपक्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेश सराफ व रिपाइंचे जिल्हाध्यक्ष विजय आगलावे पत्रकार परिषदेत मोदींच्या जाहीर सभे बाबत माहिती दिली आहे.

२०१४ साली झालेल्या निवडणुकीची महाराष्ट्रातील पहिली सभा सुद्धा वर्ध्यातच घेण्यात आली होती. त्यामुळे वर्धा भाजपसाठी लकी ठरत असल्याने या वेळीचा शुभारंभ देखील वर्ध्यातच करण्याचे ठरवण्यात आले आहे. वर्ध्यातील स्वावलंबी मैदानात २८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. येथील सभा आटपून नरेंद्र मोदी अकोला अथवा नंदुरबार या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे.

वर्ध्याचा भाजप उमेदवार निश्चित करण्यात आला आहे. मात्र पक्ष शिस्तीमुळे त्या उमेदवाराची घोषणा करता येणार नाही असे सुधीर दिवे यांनी सांगितले आहे. वर्ध्यातून विद्यमान खासदारांना पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता फक्त त्यांच्या नावाची औपचारिक घोषणाच बाकी हे असे भाजपच्या गोटात बोलले जाते आहे.