काँग्रेसचा पुन्हा ‘रडी’चा डाव, राहूल गांधी म्हणाले मोदींनी ‘अशा’ पध्दतीने जिंकल्या निवडणूका

कलपेट्टा (केरळ) : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीमध्ये केरळमधील वायनाडमधून विक्रमी मताधिक्क्याने निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर असणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मोदींवर जोरदार टीका केली आहे. कलपेट्टा या ठिकाणी रॅलीला संबोधताना मोदींनी खोटं बोलून निवडणूक जिंकल्याचा आरोप त्यांनी केला. मोदींनी खोटं बोलून आणि द्वेष पसरवून निवडणूक जिंकली असून आम्ही मात्र याचे उत्तर प्रेम, सत्य आणि स्नेहानेच देऊ असे सांगितले.

वायनाड लोकसभा क्षेत्रातील कलेक्टर कार्यालयाजवळून गांधींनी आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. या ठिकाणी त्यांनी व्यापक स्तरावर लोकांशी संवाद साधत आभार प्रदर्शन केले. या वेळी त्यांनी वायनाड मधील सर्व लोकांसाठी मी नेहमी उपलब्ध असून तुमच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे हे स्पष्ट केले. कालेपट्टा येथील राहुल गांधींचा रोड शो पाहण्यास आलेल्या लोकांशी देखील त्यांनी संवाद साधला. शनिवारी राहुल गांधींच्या आणखीन २ रोड शो चे आयोजन केले आहे. या वेळी त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष मुल्लापल्ली रामचंद्रन, विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला आणि ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे महासचिव केसी वेणुगोपाल उपस्थित होते.

‘मोदी देशात द्वेष पसरवितात’ कालदेखील साधला होता मोदींवर निशाणा:

काल केरळमध्ये पोहोचल्यानंतर राहुल गांधींनी आपल्या प्रथम सभेमध्ये लोकांनी निवडणुकीमध्ये दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले होते. तसेच मोदींवर पण निशाणा साधला होता. निलंबर येथील जनसभेत त्यांनी प्रस्थापित सरकार आणि नरेंद्र मोदी जनतेमध्ये द्वेष पसरवत असून काँग्रेस मात्र याचे उत्तर केवळ प्रेमानेच देईल. कारण पराकोटीच्या द्वेषावरती हाच एकमेव यावर उपाय असल्याचे काँग्रेस जाणून आहे असे वक्तव्य केले होते. मी आपले प्रतिनित्व करण्यास आणि वायनाड चा सर्वोत्तम विकास करण्यास कटिबद्ध आहे असे त्यांनी जनतेस सांगितले.

नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये अमेठीमधून स्मृती इराणी यांच्या विरोधात गांधींना हार पत्करावी लागली होती. परंतु वायनाड मधील जनतेने साथ देत 4.31 लाख पेक्षा अधिक मताधिक्याने राहुल गांधींना निवडून दिले होते. त्यानंतर हा गांधींचा मतदारसंघातील पहिलाच दौरा आहे.