चंद्रयानशी संपर्क तुटला, हिमंत नाही तुटली ! नरेंद्र मोदी यांचा राष्ट्राला संदेश

श्रीहरिकोटा : चंद्रात पाऊल ठेवण्यास जात असताना २.१ किमी अंतरावर विक्रम लॅडरशी संपर्क तुटल्याने शास्त्रज्ञांसह संपूर्ण देश दु:खात बुडाला. सर्वांचे सांत्वन करताना नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला संबोधित करताना सांगितले की, चंद्रयानाशी संपर्क तुटला असला तरी हिमंत नाही. संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे.
जवळपास दीड महिन्यांपूर्वी म्हणजे २२ जुलै रोजी श्रीहरिकोटा येथून झेपावलेले चांद्रयान २ ने अनेक महत्वाचे टप्पे पार पाडत चंद्राजवळ पोहोचले. मात्र काही तांत्रिक कारणामुळे विक्रम लँडरचा संपर्क तुटला आहे. या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी संपूर्ण देश क्षणांक्षणाचे अपडेट पाहत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह संपूर्ण देश रात्रभर जागून हा अनुभव घेत होता.मात्र विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठ भागापासून २.१ किलोमीटरपर्यंत पोहोचले असताना संपर्क तुटला. विक्रम लँडरशी संपर्क तुटल्याने शास्त्रज्ञांबरोबरच संपूर्ण देशाचा श्वास रोखला गेला. अनेकदा प्रयत्न केल्यानंतरही पुन्हा संपर्क होऊ शकला नाही.त्यामुळे ही मोहीम पूर्ण होऊ न शकल्याने शास्त्रज्ञांसह जगभरातील सर्व विज्ञानप्रेमी निराश झाले. यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व शास्त्रज्ञांची भेट घेऊन तुमच्या पाठीशी संपूर्ण देश असल्याचे सांगितले.त्यानंतर आज सकाळी ८ वाजता त्यांनी राष्ट्राला संबोधित केले. नरेंद्र मोदी म्हणाले, या मिशनच्या समवेत असलेली प्रत्येक व्यक्तीची जी अवस्था आहे.  तीच माझीही अवस्था आहे.  खूप प्रश्न होते आणि मोठ्या यशस्वीतेसह पुढे जात असताना अचानक सर्व काही दिसणे बंद झाल. हा क्षण तुमच्याबरोबर मीही अनुभवला आहे. जसा संपर्क तुटला आणि आपल्या सर्वांना बसलेला धक्का मी पाहतो आहे.  आज जरी काही अडथळे आले असतील पण यामुळे आमची हिमंत कमजोर पडणार नाही. उलट आणखी मजबूत झाली आहे.

गेले काही तास देश जागा आहे. आम्ही सर्व शास्त्रज्ञांनाच्या पाठीशी आहोत. आम्ही खूप जवळ पोहचलो होतो. पण यापुढील काळात आम्हाला आणखी दूरचे अंतर कापायचे आहे. सर्व भारतीयांना आज आपल्या अवकाश कार्यक्रम आणि वैज्ञानिकांचा गर्व आहे,  अशा शब्दात मोदी यांनी सर्वांचे सांत्वन केले.विक्रम लँडरचा संपर्क तुटल्यानंतर कोणीही काहीही माहिती देत नव्हते. इस्त्रोचे प्रमुख के. सिवन यांनी संपर्क तुटल्याची माहिती पंतप्रधानांना दिली. त्यानंतर ते त्या ठिकाणावरुन निघून गेले. त्यानंतर काही वेळाने अधिकृतपणे विक्रम लँडरशी संपर्क तुटल्याचे जाहीर करण्यात आले.

काही वेळाने पंतप्रधान मोदी यांनी या मोहिमेतील सर्व शास्त्रज्ञांची भेट घेऊन त्यांना निराश न होण्याचे आवाहन केले. के. सिवन यांची पाठ थोपटत त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी ट्विट करीत शास्त्रज्ञांचा गर्व असल्याचे सांगितले.