राम मंदिरावरून PM मोदींचा शिवसेनेला ‘खोचक’ टोला

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीमध्ये नाणार प्रकल्पावरून भाजपवर दबाव तंत्र वापरून शिवसेनेने हा प्रकल्प रद्द करण्यास भाग पाडले होते. त्यानंतर आता शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा उचलून धरत भाजपला टार्गेट केले आहे. राम मंदिर प्रश्नावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमध्ये शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे. राम मंदिराचा मुद्दा सुप्रीम कोर्टात आहे. न्यायालय प्रकरण ऐकून घेत आहे. हे वाचाळवीर कुठून टपकतात असा खोचक टोला मोदींनी शिवसेनेला लगावला आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराचा मुद्दा उचलून धरला आहे. जम्मू-काश्मीरसाठीचे 370 कलम रद्द करताना केंद्र सरकारने जसे धाडसी पाऊल उचलले, तसेच पाऊल अयोध्येत राम मंदिराची उभारणी करण्यासाठी उचलत त्यासाठी कायदा करावा अशी मागणी केली होती. मोदींचा वाचाळवीर हा टोला उद्धव ठाकरे यांच्यासाठीच होता अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप करण्यात आला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी राम मंदिरावर त्यांची भुमिका स्पष्ट केली. राम मंदिर प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. त्यासाठी न्यायालयावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून काही लोक राम मंदिरासंबंधी नको ती वक्तव्य करत आहेत.

Visit – policenama.com