उदयनराजेंना टक्कर देण्यासाठी ‘या’ राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमिवर अनेक नेते मंडळींचे इतर पक्ष प्रवेशाचे सत्र सुरु झाले आहे. सातारा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे उमेदवार विद्यमान खासदार उदयनराजे भोसले आहेत. त्यांना टक्कर देण्यासाठी शिवसेनेने राष्ट्रवादीच्याच माजी आमदाराची निवड केली आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार नरेंद्र पाटील हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेनेकडून नरेंद्र पाटलांना उदयनराजे यांच्या विरोधात साताऱ्यातून उमेदवारी दिली जाणार आहे. कोल्हापुरात आयोजित युतीच्या मेळाव्यात नरेंद्र पाटील शिवसेनेत प्रवेश करतील.

सातारा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांच्या विरोधात भाजपने नरेंद्र पाटील यांचे नाव पुढे येत होते. मात्र नरेंद्र पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश न करता शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपने नरेंद्र पाटलांचे नाव पुढे केल्याने ते भाजपमध्ये प्रवेश करतील असे वाटत होते.

माथाडी कामगार संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांचे नरेंद्र पाटील हे पुत्र आहेत. नरेंद्र पाटील यांची सातारा, वाई, कोरेगाव, पाटण येथे माथाडी मतदारांवर चांगली पकड आहे. मराठा मोर्चे जेव्हा निघाले होते, त्यात सातारा पट्ट्यातील लोकांचा सर्वाधिक समावेश होता. त्यामुळे ही मतं नरेंद्र पाटील यांना मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे साताऱ्यात उदयनराजेंविरोधात नरेंद्र पाटील यांना रिंगणात उतरवण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे.