नरेंद्र पाटील आणि शिवेंद्रराजे यांच्या गळाभेटीने ; उदयनराजेंचे वाढले टेन्शन

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सातारा जिल्ह्यात सध्या दोनच राजांची चर्चा आहे, एक तर उदयनराजे आणि दुसरे शिवेंद्रसिंहराजे. राष्ट्रवादीने विद्यमान खासदार उदयनराजे यांना टिकीट दिले. त्याचबरोबर दोन्ही राजांमध्ये समेट देखिल घडवून आणली. मात्र, आज शिवेंद्रसिंहराजे यांच्या वाढदिवसानिमित्त महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी त्यांची गळाभेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यामुळे मात्र, उदयेनराजेंचं टेन्शन वाढलेलं आहे. याच गळाभेटीची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.

शिवेंद्रराजे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून नरेंद्र पाटील यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच साताऱ्यात एकच राजे, शिवेंद्रराजे असं म्हणत अप्रत्यक्षरित्या उदयनराजे यांना टोला लगावला. यावेळी पाटील यांनी शिवेंद्रराजे यांच्या नावाने घोषणा देखील दिल्या. सध्या साताऱ्यात याच भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे. याआधी देखिल दोघेही चहापाण्यासाठी एका हॉटेलमध्ये भेटले होते. त्यावेळी देखिल अशाच चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे शिवेंद्रराजे आणि नरेंद्र पाटील यांची दोस्ती पुन्हा एकदा सातारकरांच्या चर्चेचा विषय झाली आहे.

साताऱ्याचे विद्यमान खासदार आणि लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देताना राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांच्यात समेट घडवून आणली होती. त्यामुळे उदयनराजेंचा लोकसभा निवडणुकीचा मार्ग सुकर झाल्याचे मानले जात होते. तसेच जावळीत झालेल्या बैठकीतही शिवेंद्रसिंहराजेंनी आपण कोणताही दगाफटका करणार नाही, तसेच उदयेनराजेंच्या पाठीशी असल्याचे म्हटले होते. मात्र, आजच्या नरेंद्र पाटील आणि शिवेंद्रराजे यांच्या भेटीमुळे उदयेनराजेंच्या अडचणीत भर पडेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.