Satara News : राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नसतो, ज्या नेत्याला लोकसभेत हरवलं, तोच आता उदयनराजेंच्या भेटीला

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन –   राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नसतो, असे नेहमी म्हटले जाते. याचा प्रत्यय रविवारी सातारकरांना आला. एकेकाळी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले दोन नेते एकत्र आले. अण्णासाहेब पाटील (Annasaheb Patil)  आर्थिक विकास महामंडळचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले ( Udayan Raje Bhosale)  यांची जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी दोघात मराठा आरक्षण प्रश्नावरील विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. निवडणुकीच्या मैदानातील लढाईनंतर आता दोन्ही नेते मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर एकत्र आल्याने चर्चेला उधाण आले आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र पाटील आणि खासदार उदयनराजे एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. नरेंद्र पाटील यांनी अचानक शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर लोकसभेला उभे राहिले होते. तर उदयनराजे यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. यावेळी उदयनराजे यांनी नरेंद्र पाटील यांचा पराभव केला होता. पाटील आणि उदयनराजे यांची लढत चांगलीच गाजली होती. पण, उदयनराजे यांनी सहज निवडणूक जिंकली होती.

दरम्यान, उदयनराजे भोसले यांनी महाविकास आघाडी सरकारला धक्का देत साताऱ्यातील ग्रेड सेपरेटरचे शुक्रवारी उदघाटन उरकले होते. त्यानंतर साताऱ्यात अनेक घडामोडी घडल्या. ग्रेड सेपरेटरवरील नाम फलक फाडल्याने तणाव निर्माण झाला होता आणि यानंतर लगेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साताऱ्यात दाखल झाले. साताऱ्यातील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी बांधकाम विभाग आणि महसूल खात्यातील अधिकाऱ्यांशी त्यांनी कमराबंद चर्चा केली. बैठकीत मात्र अजित पवार काय म्हणाले हे मात्र गुलदस्त्यात असलेतरी साताऱ्यातील ग्रेड सेपरेटर च्या उद्घाटनावरून वाद पेटणार असून दुसऱ्यांदा शासनाच्या वतीने उदघाट्न होणार असल्याची चर्चा आता होऊ लागली आहे.