‘काँग्रेस अध्यक्षपदासाठी प्रियंका गांधींची मुलंही योग्य उमेदवार’, भाजपाच्या ‘या’ मंत्र्याचा निशाणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   काँग्रेसचे भावी अध्यक्ष म्हणून थेट प्रियांका गांधी यांच्या मुलांची दावेदारीच्या विचार करता येईल, असा सल्ला देत काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन मध्यप्रदेशचे मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ‘काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी प्रियांका गांधींची मुलं योग्य उमेदवार’ असा टोला मिश्रा यांनी काँग्रेसला लगावला आहे.

काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असताना मिश्रा म्हणाले की, ”काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अनेक पात्र उमेदवार त्यांच्या पक्षाकडे आहेत. त्यात राहुल गांधी, प्रियांका गांधी, रिहाना वढेरा, मिरयाना वढेरा यांचा समावेश आहे. काँग्रेस ही अशी शाळा आहे जिथे मुख्याध्यापकांची मुलं पहिली येतात, हे काँग्रेसच्या सदस्यांनी लक्षात घेतलं पाहिजे” असं त्यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधींची नाराजी

दरम्यान, काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीपूर्वी अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहणाऱ्या २३ नेत्यांविरुद्ध काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी बैठकीदरम्यान उघड नाराजी व्यक्त केली आहे. पक्ष नेतृत्वाबद्दल लिहण्यात आलेल्या पत्राच्या वेळेवर राहुल यांनी बोट ठेवलं. राजस्थानात पक्षाचं सरकार अडचणीत असतानाच पत्र का लिहण्यात आलं, त्या पत्रावर कार्यसमितीच्या बैठकीत चर्चा अपेक्षित असताना ते माध्यमात कसे पोहोचलं, असा प्रश्न राहुल यांनी उपस्थित केला.

सोनिया गांधीच हंगामी अध्यक्षा

काँग्रेस पक्षाच्या आज झालेल्या कार्यसमितीच्या बैठकीत प्रचंड गोंधळ झाला. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यात आल्या. काँग्रेसचे जेष्ठ नेते गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल यांच्यावर भाजपाशी हातमिळवणी केल्याबाबतच्या बातम्या प्रसारित झाल्या. त्यानंतर पक्षाकडून सारवासारव करण्यात आली. ७ तास चाललेल्या काँग्रेसच्या कार्यसमितीच्या बैठकीत आगामी ६ महिन्यांसाठी सोनिया गांधीच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष राहतील यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.