‘हा तर तमाशा’ असं म्हणत Love-Jihad वर बोलले नसीरूद्दीन शाह, म्हणाले – ‘कोणाचंही धर्मपरिवर्तन करणं…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह (Naseeruddin Shah) नेहमीच समाजातील अनेक मुद्द्यावर आपलं स्पष्ट मत मांडताना दिसत असतात. यामुळं कधी कधी त्यांना टीकेलाही सामोरं जावं लागतं. आता त्यांनी लव जिहाद (Love Jihad) वरून सुरू असलेल्या वादावर भाष्य केलं आहे. यासाठी त्यांनी त्यांच्या आणि रत्ना पाठक (Ratna Pathak) यांच्या लग्नाचं उदाहरण दिलं आहे.

‘लव जिहाद हा तमाशा’
नसीरूद्दीन शाह यांनी एका मुलाखतीत बोलताना आपल्या मनातील चिंता व्यक्त करत सांगितलं की, लव जिहादच्या नावाखाली हिंदू आणि मुस्लिमांमध्ये द्वेष पसरवला जात आहे. युपीमध्ये लव जिहादच्या तमाशात लोकांना कसं विभागलं जात आहे हे पाहून मला राग येतो. त्यांनी हा शब्द तयार केला आहे. त्यांना जिहाद या शब्दाचा अर्थ माहित नाही. भारतात मुस्लिमांची संख्या हिंदूंपेक्षा जास्त होईल असा विचार करण्याइतका कोणी मुर्ख कसा असेल हे मला समजत नाही.

‘एखाद्याचं धर्मांतर करणं पूर्णपणे चुकीचं’
धर्मांतर आणि लग्नाबद्दल बोलताना नसीरूद्दीन शाह म्हणाले, रत्ना पाठक लग्नानंतर आपला धर्म बदलणार नाही हे त्यांनी आपल्या आईला स्पष्टपणे सांगितलं होतं. पुढं ते म्हणाले, माझी आई अशिक्षित होती, रूढीवादी कुटुंबात मोठी झाली, दिवसातून पाचवेळा नमाज करायची, तिनं आयुष्यभर उपवास केले. हजला गेली. म्हणाली, लहानपणापासून आम्ही तु्म्हाला ज्या गोष्टी शिकवल्या त्या कशा बदलतील. एखाद्याचं धर्मांतर करणं पूर्णपणे चुकीचं आहे.