भाजपला पुन्हा एकदा मोठा ‘धक्का’, मुंबई आणि नाशिकमध्ये फडकला शिवसेनेचा ‘भगवा’

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या भाजपाला महाराष्ट्रात मोठ्या परावभावाचा सामना करावा लागत आहे. विधानसभेला मुख्यमंत्री पदावरून झालेल्या वादातून भाजपा शिवसेना यांच्यात ताटातूट झाली आणि सत्ता स्थापन करण्यासाठी विरोधक मित्र झाले आणि राज्यात महाविकास आघाडीची स्थापना झाली. तेव्हापासून भाजपाला हार चा सामना करावाच लागत आहे.

महाविकास आघाडीमुळे भाजपाला पुन्हा एकदा जोरदार धक्का बसला आहे. मुंबई आणि नाशिक येथील रिक्त नगरसेवक पदाच्या जागांसाठी भाजपाला अपयश आले असून महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. मुंबई महापालिका प्रभाग क्रमांक १४१ मधील पोटनिवडणुकीत शिवसेनेनं भाजपाला धूळ चारली आहे. या प्रभागातून शिवसेनेचे विठ्ठल लोकरे विजयी झाले असून लोकरे यांनी भाजपाचे बबलू पांचाळ यांचा पराभव केला आहे. या प्रभागात शिवसेना, भाजपा आणि काँग्रेस सहित एकूण १८ उमेदवार मैदानात होते.

विठ्ठल लोकरे यांना ४४२७ इतकी मतं मिळाली तर भाजपाचे उमेदवार दिनेश पांचाळ यांना ३०४२ मतं मिळाली. त्यामुळे लोकरे यांचा तब्बल १३८५ मतांनी दणदणीत विजय झाला आहे. मुंबई महापालिकेच्या मानखुर्द वार्ड क्रमांक १४१ मध्ये लोकरे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ९ जानेवारी रोजी मतदान पार पडले. यामध्ये प्रमुख लढत शिवसेनेचे विठ्ठल लोकरे, भाजपचे बबलू पांचाळ, काँग्रेसचे काजी अल्ताफ महंमद, एमआयएमचे खान सद्दाम हुसेन इमाम ऊद्दिन आणि समाजवादीचे खान जमिर भोले या प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये झाली.

नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा विजय, शिवसेनेनं मारली बाजी

मुंबईप्रमाणेच नाशिकमध्येही महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. नाशिकमध्ये प्रभाग क्रमांक २६च्या पोटनिवडणुकीत देखील शिवसेनेने बाजी मारली असून शिवसेनेचे मधुकर जाधव हे विजयी झाले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेचे उमेदवार मधुकर जाधव यांना पाठिंबा जाहीर केला होता. जाधव यांच्या विरोधात आधी सेनेत असलेले आणि आत्ता मनसेत गेलेले उमेदवार दिलीप दातीर हे उभे होते.

नाशिकमध्ये या निवडणुकीत खऱ्या अर्थाने खान्देशी मतं निर्णायक ठरली आहेत. येथे खरी लढत ही मनसेचे दिलीप दातीर आणि शिवसेनेचे मधुकर जाधव यांच्यात होती. या निवडणुकीत भाजपाला मोठ्या पराभवास सामोरे जावे लागले असून भाजपाचा उमेदवार तिसऱ्या स्थानी राहिला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/