Lockdown : संचारबंदीत नाशिकमधील नगरसेवकाची ‘क्रिकेट मॅच’, तरुणीनं FB Live करून घडवली ‘अद्दल’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – देशात आणि राज्यात कोरनामुळे हाहाकार उडाला आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर पावलं उचलत आहे. देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

नागरिकांना घराबाहेर पडण्यास परवानगी नसल्याने राज्यातील जनता घरात बसून आहे. मात्र, सरकारच्या नियमांची पायमल्ली करत राजकीय नेतेच गर्दी करत असल्याचे दिसत आहे. नगरसेवक आणि सिडकोचे सभापती दीपक दातीर यांनी आपल्या 10 ते 15 कार्यकर्त्यांसोबत क्रिकेट खेळत होते. मात्र, एका तरुणीने नगरसेवकाला अद्दल घडवली आहे.

देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. नाशिकमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये म्हणून प्रशासनाकडून आवाहन केलं जात आहे. परंतु, तरीही संचारबंदीचे नियम धाब्याबर बसवून लोकप्रतिनिधी असलेले नगरसेवक दीपक दातीर क्रिकेट खळताना आढळून आले.

या परिसरात राहणाऱ्या एका तरुणीने धाडस करून दातीर यांचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दातीर यांच्यावर संचारबंदी उल्लंघन केल्याप्रकरणी कलम 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दातीर यांच्यासह 10 ते 15 कार्यकर्त्यांवर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणीने मैदानात जाऊन दातीर यांनी संचारबंदी लागू असताना क्रिकेट का खळेताना असा सवाल केला. ही तरुणी फेसबुक लाईव्ह करतेय असं सांगितल्यावर दातीर यांची चांगलीच भांबेरी उडाली. यावेळी तरुणीने विचारलेल्या प्रश्नांची दातीर यांनी उडावउडवीची उत्तरे दिले.