नाशिकमध्ये कोविड रूग्णालय शिवसेनेच्या पुढाकारानं पण उद्घाटन राष्ट्रवादीच्या नेत्याच्या हस्ते

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – नाशिकच्या सिडको परिसरात आज (रविवार) एका कोविड रुग्णालयाचं उद्घाटन झाल. मात्र कोविड रुग्णालयाच्या उद्घाटनावरून शहरात चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. कारण येथील कोविड हॉस्पिटल हे शिवसेनेच्या पुढाकारानं उभारण्यात आलं आहे. मात्र, हॉस्पिटलचं उद्घाटन मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर होणाऱ्या अनेक कार्यक्रमातील व्यासपीठावर दिसणारा हा बदल आतापर्यंत नेहमीच चर्चेचा मुद्दा ठरला आहे.

अगदी काल परवापर्यंत एकमेकांवर टीका करणारे नेते आता चक्क एकमेकांची स्तुती करताना दिसत आहेत. यामुळे लोकांची चांगली करमणूक होत आहे. शिवेसेनेच्या बाळासाहेब ठाकरे कोविड रुग्णालयाचं रविवारी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आलं. आव्हाड यांच्या हस्ते हॉस्पिटलचं लोकार्पण करण्यात आलं. या वेळी जितेंद्र आव्हाड यांनी रामजन्मभूमी भूमिपूजन कार्यक्रमावर चांगलंच तोंडसुख घेतलं.

आव्हाड म्हणाले, प्रभू रामचंद्र कोणाच्या सातबाऱ्यावर नाहीत. तो सातबारा कोणाच्या मालकीचा नाही. रामाच्या नावे राजकारण करणं वेगळं आमि भक्ती करणं वेगळं. ज्याच्यामध्ये प्रामाणिकपणा आहे, ज्याच्या मनात आई-वडिलांबद्दल आत्मीयता आहे, ज्याच्यात मर्यादा आहेत, त्याच्यात कुठेतरी राम लपलेला आहे. मर्यादा पुरुषोत्तम राम असं आपण म्हणतो… त्यामुळे हे भूमिपूजन करत आहेत त्याचं एवढं काही नाही… त्यांना वाटतं ते करत आहेत, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.