तब्बल 40 कर्मचार्‍यांना ‘कोरोना’ झाल्यामुळे नाशिकमधील नोटछपाई 5 दिवसांसाठी बंद

पोलिसनामा ऑनलाईन टीम – नाशिकमधील चलन मुद्रणालयातील 40 पेक्षा जास्त कर्मचार्‍यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. एकूण कर्मचार्‍यांपैकी दोन टक्के कर्मचारी बाधित झाल्यामुळे कामकाज पाच दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले आहे.

चलनी नोटा, मुद्रांक, टपाल तिकिटे, पारपत्र यांची छपाई करणार्‍या येथील चलार्थपत्र (सीएनपी) आणि भारत प्रतिभूती या दोन्ही मुद्रणालयांत कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने नोटा छपाई, मुद्रांक, पारपत्र छपाई बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती आय.पी.एस मजदूर संघाचे पदाधिकारी जगदीश गोडसे यांनी दिली.

मुद्रणालयांतील साडेतीन हजारांहून अधिक कामगार तणावाखाली आहेत. मुद्रणालयापासून जवळच्या वसाहतीत कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने मनपाने हे क्षेत्र प्रतिबंधित म्हणून जाहीर केले आहे. या भागात अनेक कामगार राहतात. नाशिकरोड परिसरासह चार तालुक्यांतील कामगार मुद्रणालयात कामावर ये-जा करतात. मुद्रणालयातही शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जात नसल्याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर महाप्रबंधकाशी चर्चा झाल्यानंतर करोनाची साखळी खंडित करण्यासाठी मुद्रणालय बंद राहणार आहे. उत्पादनाला बाधा न येण्यासाठी कामाचे दिवस आणि सुटयांची जोडणी करत स्थानिक व्यवस्थापनावर निर्णय सोडण्यात आला होता. त्याप्रमाणे मजदूर संघ आणि दोन्ही मुद्रणालयांच्या अधिकार्‍यांसमवेत बैठक होऊन रविवारपासून 3 सप्टेंबपर्यंत काम बंद ठेवण्यात आले आहे.