नाशिकमधील गॅस सिलिंडर स्फोट दुर्घटनेत जखमी झालेल्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू; आतापर्यंत 4 सख्ख्या भावांसह 7 जणांचा बळी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – नऊ दिवसापूर्वी नाशिक येथे घरगुती गॅस सिलिंडर बदलताना गॅसगळती होऊन सिलिंडरचा स्‍फोट झाला होता. या दुर्घटनेत 7 जण जखमी झाले होते. या दुर्घटनेतील एकमेव उरलेल्या मुलीचा आज रविवारी (दि. 11) उपचारादरम्यान मृत्यू झाला. नणंद भावजयीसह 4 सख्ख्या भावांचा व एका बहिणीचा असे एकाच कुटुंबातील 7 जणांचा बळी या दुर्घटनेत गेला आहे. एकाच कुटुंबात लागोपाठ 7 मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मुस्कान वलीऊल्लाह अन्सारी (वय 21) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. शुकवारी (दि. 2) रोजी रात्री इगतपुरीवाला चाळीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या संजरीनगर सोसायटीच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या सय्यद यांच्या घरात सिलिंडर बदलताना गॅस गळती होवून स्फोट झाला होता. स्फोटात कुटुंबातील 7 व्यक्ती गंभीररित्या जळून जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. घटनेच्या नऊ दिवसात एका पाठोपाठ 7 जणांचा मृत्यू झाला आहे. काल दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. आज बहिण मुस्कान हीचा देखील रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेने कुटुंबियांवर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.