नाशिक : कॅन्सरग्रस्त रुग्णाचा बेडअभावी मृत्यू, रिक्षातच सोडले प्राण

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन : राज्यासह देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्ययंत्रणांवर याचा मोठा ताण येत आहे. परिणामी, कोरोनासह इतर काही आजाराने ग्रस्त असलेले अनेक रुग्ण उपचारांअभावी दगावत आहेत. असाच प्रकार नाशिकमधील लेखानगर येथे पाहिला मिळाला.

नंदू सोनवणे असे उपचाराअभावी मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. नंदू हे पालिकेचे सफाई कर्मचारी म्हणून सिडको विभागात कार्यरत होते. त्यांना कॅन्सर झाल्याचे निदान काही दिवसांपूर्वी झाले होते. त्यामुळे ते काही दिवसांपासून रजेवर होते. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. मात्र, त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी त्यांच्या मुलीने अथक मेहनत घेतली.

नंदू यांना सर्वप्रथम सामान्य रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, तेथून लाईफ केअर रुग्णालयात पाठवले होते. पण तिथे गेल्यावर इतर रुग्णालयात पाठवण्यात आले. सगळीकडे फिरता फिरता त्यांना कुठेच बेड मिळाला नाही. अखेर रिक्षातच नंदू सोनवणे यांनी एका खासगी रुग्णालयाच्या दारातच प्राण सोडले, अशी माहिती त्यांच्या मुलीने दिली.

कोरोनाबाधित नव्हते…

नंदू सोनवणे यांना कोरोनाची लागण झाली नव्हती. त्यांना कॅन्सरचे निदान झाल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न होता. मात्र, त्यातच त्यांचा मृत्यू झाला.