दारू पिऊन गुंडांचा हौदोस अन् महंताना मारहाण

नाशिक : पोलिसनामा ऑनलाइन – राज्यात मागील ५४ दिवसांपासून सुरु असलेल्या लॉकडाऊन दरम्यान गुन्हेगारीच्या प्रमाणात मोठी घट झाली होती. मात्र, लॉकडाऊन मध्ये काही प्रमाणात शिथिलता मिळाल्यानंतर दारूविक्री पुन्हा सुरु झाली आहे. त्यामुळे गुन्हेगारीच्या प्रमाणात देखील वाढ होताना दिसतं आहे. असाच काही प्रकार देवभूमी समजल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये घडला आहे. शहरात तपोवन परिसरामध्ये काही मद्यपींनी एका महंताला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

महाराष्ट्रात दारू विक्री सुरु झाल्याने मद्यपींचा उद्रेक झाला असून, रात्रीच्या सुमारास भरधाव वेगात गाडी चालविणे, रस्त्यावरती धिंगाणा घालणे आणि मारहाण करण्याचे प्रकार नाशिकमध्ये पुन्हा वाढले आहेत. तसंच पवित्र समजला जाणारा आणि ज्या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळ्यात साधू महंत वास्तव करतात त्या तपोवन परिसरामध्ये मद्यपींचा आणि गुंडाचा अड्डा बनला आहे. लॉकडाऊन काळात देखील तपोवन परिसरात दारू पिऊन धिंगाणा घालणे, परिसरातील रहिवाशांना शिवीगाळ करणे, धमकविण्याचे प्रकार वाढल्याचे दिसत आहे.

त्यातच आता तपोवन परिसरातील साक्षी गोपाळ मंदिराच्या महंतांनाच काही मद्यपींनी मारहाण करत दगडफेक केल्याची घटना घडली आहे. महंत नंदरामदास यांना मद्यपी तरुणांनी मारहाण केली आहे. या प्रकरणी महंतांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, महंतांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी चौघा मद्यपींना ताब्यात घेतलं आहे. स्थानिक नागरिकांनी म्हटलं आहे की, अनेकदा तक्रारी करून देखील पोलिसांची गस्त वाढत नसल्याने मद्यपींचा परिसरात धोका वाढत आहे. याआधीच पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असती तर या परिसरामध्ये गुंडाची ताकद वाढली नसती.

दरम्यान, या प्रकरणामध्ये पोलिसांनी अधिक चौकशी सुरु केली आहे. तसेच या परिसरामध्ये गस्त वाढविण्याची देखील ग्वाही पोलिसांकडून देण्यात आली आहे.