बिबट्याचा हल्ला : झोपलेल्या महिलेला ओढून नेले, परिसरात घबराहट

पोलिसनामा ऑनलाईन, इगतपुरी, दि. 8 ऑगस्ट : बिबट्याने हल्ला करून झोपलेल्या महिलेला ओढून नेल्याची घटना इगतपुरी तालुक्यातील चिंचलेखैरे येथे घडली आहे. यात 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

भोराबाई महादु आगीवले असे या महिलेचे नाव आहे. या महिलेचा मृतदेह त्यांच्या घरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर वन विभागाला आणि पोलिसांना आढळला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, इगतपुरी शहरापासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर चिंचलेखैरे हे गाव आहे. भोराबाई घरी 7 ऑगस्टला रात्री जेवण करून घरासमोय झोपी गेल्या होत्या. यावेळी त्यांची मुलगी, जावई आणि मुलं हे देखील घरात झोपले होते. पहाटेच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून भोराबाई यांना झोपेतून ओढून नेले.

सकाळी घरातील इतर लोक उठल्यावर बाहेर भोराबाई अंथरूणात दिसल्या नाहीत. त्यांचा आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला. तेव्हा एका ठिकाणी झाडांच्या झुडपात त्यांचा मृतदेह आढळला. त्यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस आणि वन विभागाने पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रूग्णालयात पाठविला.

या घटनेमुळे परिसरात घबराहट पसरली आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभाग सापळा रचून पिंजरा आणि कॅमेरे लावणार आहे. या भागातील गावकर्‍यांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे, असे वन विभाग अधिकारी रमेश डोमसे यांनी सांगितले आहे.