लासलगाव जळीतकांड प्रकरण : अखेर पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन  – लासलगाव बसस्थानकात एका महिलेला पेटवण्यात आले होते. यात गंभीर जखमी झालेल्या पीडित महिलेचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मुंबईतील रूग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी पहाटे या पीडितेने अखेरचा श्वास घेतला. एक आठवडाभर ती मृत्यूशी झुंज देत होती. परंतु, आज ही झुंज शांत झाली. या जळीतकांडीतील 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे.

15 फेब्रुवारी रोजी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बसस्थानकात सायंकाळी 5.30 च्या सुमारास प्रेमसंबंधातील वादातून या 30 वर्षीय महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्यात आले होते. या घटनेत महिला 67 टक्के भाजली होती. महिलेच्या पहिल्या पतीचे निधन झाले असून तिने शेजारच्या रामेश्वर मधुकर भागवत याच्याशी दोन महिन्यापूर्वी निमगाव वाकडा येथील रेणुका माता मंदिरात विवाह केला होता. मात्र, रामेश्वरचा साखरपुडा अन्य मुलीशी झाल्याने दोघांमध्ये वाद भांडणे सुरू होते.

15 तारखेला सायंकाळी महिला एका व्यक्तीसोबत बसस्थानकात उभी असताना तेथे रामेश्वर आला. यावेळी त्यांच्यात पुन्हा भांडण झाले. रामेश्वरने बाटलीतून आणलेले पेट्रोल तिच्या अंगावर शिंपडले आणि पेटवून दिले. बसस्थानकातील प्रवाशांनी आणि एसटी कर्मचार्‍यांनी आग विझवली, मात्र तोपर्यंत महिला 67 टक्के भाजली होती.

जखमी आवस्थेत तिला प्रथम लासलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, प्रकृती आणखी बिघडल्याने तातडीच्या उपचारासाठी तिला मुंबई येथे पाठवण्यात आले. मुंबईत उपचार सुरू असताना शनिवारी पहाटे अखेर तिचा मृत्यू झाला.