स्‍वत: पिकवलेल्‍या कांद्‍याच्या ढिगाऱ्यातच तरुणाची विष पिऊन आत्महत्या

मालेगाव : पोलीसनामा ऑनलाईन- कांद्याला कमी भाव मिळाल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हाती निराशाच आली. कांद्याच्या विक्रीतून उत्पादन खर्चही न मिळाल्यामुळे निराश होऊन एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती मिळते आहे. कंधाणे शिवारात शुक्रवारी पहाटे ही घटना घडली. विशेष म्हणजे न विकले गेलेल्या कोंब आलेल्या कांद्याच्या ढिगावरच विष पिऊन या शेतकऱ्याने आत्महत्या केली. ज्ञानेश्वर दशरथ शिवणकर (वय २५) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, शिवणकर त्यांच्याकडे ४१ गुंठे शेती असून, आईवडीलांकडे दोन हेक्टर शेती आहे. त्‍यामध्ये शिवणकर यांनी एकरभर कांदा पीक घेतले होते. पंधरा दिवसांपुर्वीच कांद्‍याची काढणी केली होती. परंतु बाजारभाव नसल्याने शेतातच माल पडून होता. भाव वधारण्याची चिन्हे नसल्‍याने ते चिंतेत होते. त्यातच कांद्याला कोंब फुटू लागल्‍याने, उत्पादन खर्च ही वसूल होण्याची शाश्वती राहिली नसल्याच्या कारणातुन विषण्ण अवस्थेत ज्ञानेश्वर याने विष पिऊन जीवनयात्रा संपविली. तहसीलदार ज्योती देवरे व पोलिस निरीक्षक के के पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ज्ञानेश्वर यांचे ७० हजार रूपयांचे कर्ज असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ज्ञानेश्वर यांच्या पश्चात आईवडील, भाऊ, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.