अहमदाबाद ‘लॉक’मुळं नाशिकचं मार्केट डाऊन !

म्हसरूळ : पोलिसनामा ऑनलाईन – देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, दिवाळीनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने काही राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथेही लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात पालेभाज्यांची आवक झाली. त्यामुळे दरात मोठी घसरण झाली. परिणामी, बळीराजा संकट सापडला आहे.

आता भिस्त मुंबईवरच
नाशिकच्या पालेभाज्यांची मुख्य बाजारपेठ अहमदाबाद आहे. मुंबईलाही मोठी मागणी असते त्यामुळे नाशिकला पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणाऱ्या भाजीपाल्यांपैकी सुमारे ४० टक्के माल अहमदाबादला, ४० टक्के माल मुंबईला, तर २० टक्के माल स्थानिक बाजारपेठेत विक्री होतो. त्यामुळे मुंबईप्रमाणेच अहमदाबाद ही नाशिकसाठी मुख्य बाजारपेठ मानली जाते. परंतु कोरोनामुळे अहमदाबादमध्ये पुन्हा लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे तिथे पालेभाज्या पाठविता येणार नसल्याने बाजार समितीत मालाची प्रचंड आवक वाढली आहे. परिणामी, पालेभाज्यांच्या दरात कमालीची घसरण झाली आहे. आता शेतकऱ्यांची भिस्त मुंबईवरच राहणार असून, स्थानिक बाजारपेठेकडेही लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. दरम्यान, गावठी कोथिंबीर प्रतिशेकडा १०० ते १,१०० रुपये, चायना कोथिंबीर ५० ते ८५०, मेथी १०० ते ९५०, शेपू २०० ते ९०० व कांदापात एक हजार ते दोन हजार ८०० रुपये असा भाव मिळाला.

लिलावासाठी जागा अपुरी
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत जवळपास दोन ते अडीच लाख जुडी आवक झाली होती. पालेभाज्यांची आवक वाढल्याने लिलावासाठी जागा अपुरी पडली . विशेष म्हणजे चायना कोथिंबीरीच्या जवळपास अडीच हजार जुडी लिलाव न झाल्याने अक्षरशः पडून होती.

पालेभाज्या लागवडीवर भर
नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये सिन्नर, निफाड आणि दिंडोरी या तालुक्यांतून पालेभाज्यांची प्रामुख्याने आवक होत असते. या वर्षी मनमाड, येवला, चांदवड आदी तालुक्यांतही पालेभाज्यांची लागवड वाढली. शिवाय काही महिन्यांपासून कांद्याच्या विक्रीचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी कांदा पिकाऐवजी पालेभाज्या लागवडीकडे लक्ष केंद्रित केले.

You might also like