नाशिकमध्ये भाजप-मनसे युती निश्चित, राज्यातही युती होणार का ?

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात भाजप – शिवसेना संबंध खूप ताणले गेले आहेत. त्यामध्येच आता शिवसेनेला चितपट करण्यासाठी भाजपकडून मनसेला जवळ करण्याच्या प्रयत्न करण्यात येत आहे. याचा प्रत्यय सध्या नाशिकमध्ये पाहायला मिळत आहे. स्थायी समितीच्या निवडणुकीत शिवसेनेला मात देण्यासाठी मनसेने भाजपला साथ देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये स्थायी समितीची निवडणूक ही राज्याच्या राजकारणात भाजप-मनसे युतीची पहिली पायरी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवसेनेचा भाजपला शह देण्याचा प्लॅन
शिवसेना – भाजप यांच्यामधील संबंध गेल्या काही दिवसांपासून खूपच ताणले गेले आहेत. सध्या राज्यात गाजत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या निमित्ताने शिवसेनेला कोंडीत पकडून चहुबाजुनी भाजपने हल्ला चढवला आहे. लवकरच मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक महापालिकेच्या निवडणूका होणार आहेत. त्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा फॉर्म्युला वापरुन भाजपला धक्का देण्याचा शिवसेनेचा प्लॅन आहे.

भाजप करणार मनसेला जवळ
भाजपने सुद्धा शिवसेनेचा कट्टर विरोधक असलेल्या मनसेला जवळ करण्यासाठी व्यूहरचना तयार केली आहे. सध्या मनसे ही नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीच्या निवडणुकीत किंगमेकरच्या भूमिकेत आहे. त्यामुळे लवकरच आपल्याला भाजप-मनसे पुन्हा एकत्र आल्याचं पाहायला मिळणार आहे.

भाजपचा स्थायी सभापतीपदाचा मार्ग मोकळा
नाशिक स्थायी समितीच्या निवडणुकीत चुरस निर्माण होण्याचं महत्वाचे कारण म्हणजे या स्थायी समितीत भाजपाचे ८ सदस्य आहे तसेच महाविकास आघाडीचे सुद्धा ८ सदस्य आहेत. त्यामुळे आता मनसेचा एक सदस्य ज्याच्या पारड्यात मत टाकेल, त्यालाच सभापतीपदाची लॉटरी लागणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. या परिस्थितीमध्ये मनसे भाजपला मदत करणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे भाजपचा सभापती होण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. तसेच भाजपने दगाफटका टाळण्यासाठी आपले सगळे सदस्य गुजरातकडे रवाना केले आहे. त्या ८ सदस्यांबरोबरच मनसेचा १ सदस्य सुद्धा आहे. त्यामुळे नाशिक सभापतीपदाच्या निवडणुकांचं चित्र जवळपास निश्चित झालं आहे. गेल्या महापौरपदाच्या निवडणुकांवेळीसुद्धा मनसेने भाजपला मदत केली होती. यानंतर पुन्हा एकदा भाजप आणि मनसे स्थायी समिती निवडणुकीत एकत्र येत आहेत. त्यामुळे ही राज्याच्या नव्या राजकीय समीकरणाची नांदी तर नाही ना अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.