पहिल्याच निवडणुकीत महाविकासआघाडीला ‘ग्रहण’, भाजपाची खेळी यशस्वी ठरणार ?

नाशिक : पोलिसनामा ऑनलाइन – एकीकडे राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेच्या महाविकासआघाडीचे समीकरण जुळत आहेत असे असले तरी दुसरीकडे नाशकात महापौर, उपमहापौर निवडणुकीत महाविकासआघाडीला मोठा धक्का बसला आहे. ऐनवेळी शिवसेना, भाजप नगरसेवक फोडणाऱ्या बाळासाहेब सानप यांनी तलवार म्यान करत माघार घेतली आणि नाशिकमधील गणितं बदलले. नाशिकच्या महापौरपदी भाजपचे सतीश कुलकर्णी यांची तर भीखुबाई बागुल यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी महापौरांच्या नावाची ऑनलाइन घोषणा केली असून महाविकासघडीला याचा धक्का बसला आहे.

भाजपचा महापौर मनसेच्या पाठिंब्यावर
राज्यातील नव्या सत्ता समीकरणासाठी नाशिक महापालिका महापौर, उपमहापौर पदीची निवडणूक निर्णायक समजली जात आहे. नाशिक महानगर पालिकेची निवडणूक अखेरच्या काही तासात खूप रंगतदार ठरली असून अखेर बाजी भाजपा ने मारली आणि महाविकासआघाडीला मतदानापूर्वीच मोठा फटका बसला.

विशेष म्हणजे मनसेच्या पाचही नगरसेवकांनी भाजपाला साथ देऊन भाजपला महापौरपदी मदत केली आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवकही तळ्यात मळ्यात दिसुन आले आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी ऐनवेळी महाविकासघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊन भाजपला महापौरसाठी अप्रत्यक्ष आमंत्रणच दिले आणि यामुळेच भाजपाची दावेदारी अधिक मजबूत होण्यास मदत झाली. भाजपवरील संकट घालवण्यासाठी भाजपचे संकटमोचन म्हणून ओळखले जाणारे भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी अथक परिश्रम घेऊन भाजपच्या बाजूने महापौरपद आणण्यासाठी प्रयत्न केले असल्याची माहिती पुढे आली.

भाजपचे फुटीरांचे बंड अखेर झालं थंड…
सत्ता कायम राखण्यासाठी भाजपाने मनसेसोबत घरोबा करून मनसेच्या नगरसेवकांना आपल्या बाजूने घेतले होते. दरम्यान या नाटकीय घडामोडीत सत्ताधारी भाजपच्या 10 नगरसेवकांना महाविकासआघाडीने आपल्या तंबूत घेण्याची रणनीती आखून भाजपास धक्का दिला होता परंतु भाजपमधील फुटलेले सर्व नगरसेवक ऐनवेळी भाजपात परत आल्याने भाजपाच्या तंबूत जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. सर्वपक्षीय नगरसेवकांची सहल, मोठा घोडेबाजार, नगरसेवकांची पळवापळवी अशा नाट्याने निवडणुकीत चांगलीच रंगत आणली होती. या नाटकीय घडामोडींचा शेवट शुक्रवारी होणार असून अखेरचा टप्पा काय असणार हे पाहायला मिळणार. एकंदरीत राज्यात नव्याने उदयास आलेल्या महाविकासआघाडीच्या प्रयोगाची ही सुरुवात होती.

भाजपला कोंडीत पकडण्यासाठी शिवसेनेने अनेक प्रयत्न केले परंतु मनसेने ऐनवेळी मध्ये उडी घेत सत्तासमीकरने बदलली आणि अडचणीत सापडलेल्या भाजपास सत्ता स्थापनेसाठी मोकळीक करून दिली. काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा दर्शवला होता परंतु शिवसेना, भाजप नगरसेवक फोडणाऱ्या बाळासाहेब सानप यांनी ऐनवेळी तलवार म्यान केली आणि सत्ता समीकरण बदलून भाजपला यश मिळवून दिले त्यामुळे बाळासाहेब सानप यांची भूमिका यात फार निर्णायक स्वरूपाची ठरली.

Visit : Policenama.com