Nashik News : भाजप नेत्याने घेतली राज ठाकरेंची भेट, राजकीय चर्चांना उधाण

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सध्या नाशिक दौऱ्यावर असलेल्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी शनिवारी (दि. 6) सकाळी भेट घेतली. पालवे यांच्या भेटीमुळे मनसे भाजपला टाळी देणार का अशा चर्चांना ऊत आला आहे. आगामी महापालिका निवडणुका पाहता भाजप आणि मनसेत जवळीक वाढत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहे.

राज ठाकरे शुक्रवारपासून नाशिकमध्ये मुक्कामी आहेत. पहिल्या दिवशी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीनंतर शनिवारी पालवे यांनी ठाकरे यांची भेट घेतली. महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये मनसेने भाजपला मदत केली होती. त्यामुळे स्थायी समिती सभापती निवडणुकीतही मनसे भाजपाला मदत करणार आहे का, असा सवाल निर्माण झाला आहे. दरम्यान आगामी महापालिका निवडणुकीत नाशिकमध्ये मनसे भाजप युती होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.