धुळे : 3000 हजाराची लाच घेताना प्राचार्य अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन –   पेन्शन प्रस्तावावर सही करुन तो शिक्षणाधिकारी कार्यालयात सादर करण्यासाठी 3 हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या प्राचार्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई साक्री तालुक्यातील पिंजारझाडी येथे करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रातील लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत. गुलाब नथु पिंजारी असे लाच घेणाताना रंगेहाथ पकडलेल्या प्राचार्याचे नाव आहे.

तक्रारदार यांचे वडील पिंजारझाडी येथील न्यु इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालयातून सेवानिवृत्त होणार होते. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या प्रस्तावावर स्वाक्षरी करुन शिक्षणाधिकारी कार्यालयात पाठवण्यासाठी त्यांनी प्राचार्य गुलाब पिंजारी यांना विनंती केली. या कामाच्या मोबदल्यात प्राचार्य पिंजारी यांनी 8 हजार रुपयाची लाच मागितली. तडजोडीमध्ये तीन हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. अधिकाऱ्यांनी पडताळणी करुन सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून तीन हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडले.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सुनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, मंजितसिंग चव्हाण, संतोष हिरे, संदीप सरग, सुधीर सोनवणे, कृष्णकांत वाडीले, कैलास जोहरे, शरद काटके, प्रशांत चौधरी यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.