Coronavirus : कोरोनाचे संकट अधिक गडद; शिवसेनेच्या नगरसेविकेचा मृत्यू

पोलीसनामा ऑनलाइन टीम – नाशिक: कोरोनाचे संकट अधिक गडद होताना दिसत आहे. मेट्रो सिटीमधील बाधितांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मृत्यू दाराचेही प्रमाण वाढत चालले आहे. रोज नवनवीन प्रकरणे समोर येत असून नाशिकमध्ये शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका कल्पना पांडे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार कल्पना पांडे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून शनिवारी बाधितांच्या संख्येत चार हजार २९४ रुग्णांनी वाढ झाली आहे. तर ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या तीन दिवसात १०० जणांनी प्राण गमावले आहेत. त्यामुळे शनिवारपर्यंत बळींची संख्या दोन हजार ६५१ वर गेली आहे. नाशिक परिस्थिती अत्यंत भयंकर झाली आहे. मात्र तरीही लोकांकडून खबरदारी घेतली जात नाही. नाशिक शहरात शनिवारी एका दिवसात दोन हजार ८७ बाधित रुग्ण आढळून आले. तर मृत्यू झालेल्यांची संख्या १५ होती.

रेमडेसिविरचा तुटवडा
काही दिवसापासून राज्यात रेमडेसिविरचा तुटवडा जाणवत आहे. नाशिकची त्याला अपवाद नाही. नाशिकमध्ये गेल्या पाच दिवसापासून रेमडेसिविरसाठी नागरिकांना भटकवे लागत आहे. रेमडेसिविरची कमतरता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने इंजेक्शन पुरवण्याचे नियोजन केले. मात्र, काही डॉक्टर रुग्णांना इंजेक्शन आणण्यासाठी पाठवत असल्याने औषध दुकानाबाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

दरम्यान प्रशासनाने दिलेले हेल्पलाईन नंबरही कोणी उचलत नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी आता महात्मा गांधी रोडवर आंदोलन सुरू केलं होतं. सध्याच्या परिस्थितीमुळे नाशिकची आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडून गेली आहे. रुग्णांना बेड मिळेनासे झाले आहेत. बेड, रेमडेसिविरसाठी नातेवाईकांची धावाधाव सुरु असताना बनावट रेमडेसिविर इंजेक्शन विकल्याची घटनाही समोर आली आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपाय योजना करण्याचं आवश्यकता आहे.