नदीत उडी मारून तरुणीची आत्महत्या

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – गंगापूर रोडवरील आसाराम बापू पुलावरून एका तरुणीने नदीत उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. एका तरुणाने तिच्या होणाऱ्या पतीला तिच्याशी प्रेमसंबंध असल्याचे सांगितल्याने तिने आत्महत्या केली.

रोशनी दिलीप हिरे (वय २०, ऋषिराज हाईट्स, गंगापूर रोड) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोशनीचे २० जून रोजी लग्न होते. त्यावेळी एका शिवाजी नावाच्या तरुणाने रोशनीच्या होणाऱ्या पतीला तिच्याशी आपले प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. त्यानंतर तिचे लग्न मोडणार होते. त्यामुळे तिने आलेल्या नैराश्यातून रविवारी दुपारी गोदावरी नदीत उडी मारून आत्महत्या केली. त्यानंतर तिचा भाऊ कुणाल हिरे याने गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.