छगन भुजबळ हे नाशिकचे आसारामबापू : संजय राऊत 

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – देशभरात सध्या इलेक्शन फिव्हर आहे. पक्षातील नेत्यांचा एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला चालू आहे अशातच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका केली आहे. ‘साडेतीन वर्षे सरकारी पाहुणचार करून आलेल्या श्रद्धेय, पूजनीय अशा ‘आसाराम बापू’ अन् त्यांच्या कंपूची उर्फ भुजबळ कुटुंबीयांची नाशिककर जबाबदारी घेणार का ‘, असा सवाल राऊत यांनी केला आहे. ते नाशिक येथे महायुतीच्या मेळाव्यात बोलत होते. या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी देखील उपस्थिती लावली होती.

अनेक प्रमुख नेते पक्ष प्रवेशासाठी रांगेत उभे
नाशिक येथील मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून समीर भुजबळ निवडनुकीच्या मैदानात आहेत तर भाजपकडून  विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीच्या मेळाव्यादरम्यान बोलताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला. ते म्हणाले ‘ गोडसेच विजयी होतील  हे सांगण्यासाठी कोण्या जोतिषाची आवश्यकता नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक प्रमुख नेते पक्ष प्रवेशासाठी रांगेत उभे असल्याचा दावा महाजन यांनी यावेळी केला. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात चमत्कारीक आकडा दिसेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या कर्तृत्वाचा काय पाढा वाचावा, तो सर्व नाशिककरांना माहीत आहे. एवढे होऊनही समीर निवडणुकीला उभे राहतात, हेच विशेष आहे, अशी टीका पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी नाशिकमध्ये केली.

नरेंद्र मोदी भारताचे शेर
विरोधकांमध्ये एकवाक्यता नसतांना विरोधक राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा पराभव करायला निघाल्याची खिल्ली त्यांनी यावेळी उडवली. शिवसेना आणि भाजप एकत्र असून राज्यात आता ‘हम दो आणि हमारे ४८ खासदार’ निवडून येतील असा दावा राऊत यांनी यावेळी केला. नरेंद्र मोदी हे भारताचे शेर असल्याची पुस्टीही त्यांनी यावेळी जोडली.

या  मेळाव्याला गिरीश महाजन यांच्यासह शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत, राज्यमंत्री दादा भुसे, आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, सीमा हिरे शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, मनपा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांसह शिवसेना, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.