प्रभू रामचंद्र कुणाच्या सातबाऱ्यावर नाहीत, आव्हाडांचा भाजपला टोला

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – प्रभू श्रीराम कोणाच्या सातबारावर नाहीत असे म्हणत राज्याचे गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. रामाच्या नावे राजकारण करणं वेगळं आणि भक्ती वेगळी असंही त्यांनी म्हटलं आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते नाशिकमधील सिडको परिसरात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने कोविड रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते प्रसारमाध्यमाशी बोलत होते.

प्रभू रामचंद्र कोणाच्या सातबाऱ्यावर नाहीत. तो सातबारा कोणाच्या मालकीचा नाही. रामाच्या नावे राजकारण करणं वेगळं आणि भक्ती करणं वेगळं. ज्याच्यामध्ये प्रामाणिकपणा आहे, ज्याच्या मनात आई-वडिलांबद्दल आत्मीयता आहे, ज्याच्यात मर्यादा आहेत, त्याच्यात कुठेतरी राम लपलेला आहे. मर्यादा पुरुषोत्तम राम असं आपण म्हणतो… त्यामुळे हे भूमिपूजन करत आहेत त्याचं एवढं काही नाही… त्यांना वाटतं ते करत आहेत, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, येत्या 5 ऑगस्टला अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या या सोहळ्याला एकाही राज्यातील मुख्यमंत्र्यांना पाचारण करण्यात आलेलं नाही. केवळ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीच या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. शिवाय काही मोजक्याच मान्यवरांना या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरलीमनोहर जोशी यांनाही निमंत्रण देण्यात आलं नसल्याचे सुत्रांनी सांगितलं. दरम्यान, सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्यत बाहेरून येणाऱ्यांवर बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून उत्तर प्रदेशात नाक्यानाक्यावर येणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी केली जात आहे.