मराठा आरक्षण : जयंत पाटलांचा चंद्रकांत पाटलांना सणसणीत टोला

पोलीसनामा ऑनलाइन – राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, विरोधक राजकीय स्वार्थासाठी कोल्हेकुई करुन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा जयंत पाटील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विनायक मेटे यांच्यावर केली. नाशिकमध्ये जलसंपदा विभागाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

चंद्रकांत पाटील आणि विनायक मेटे यांच्यासोबत भाजपच्या काही नेत्यांनी मराठा आरक्षणाला महाविकास आघाडीतील काही नेत्यांचा विरोध असल्याचा आरोप केला होता. विरोधकांचे सर्व आरोप फेटाळत जयंत पाटील म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी सर्व मंत्र्यांची इच्छा असून, त्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरु आहेत. पूर्वीच्या सरकारने दिलेले वकील आरक्षणाच्या लढाईसाठी नियुक्त केले आहेत. त्यांच्या मदतीस नवीन वकील देऊन मराठा आरक्षणाची लढाई सुरु केली आहे. मराठा समाजाला आरक्षण, मिळावे अशी सर्वांची मागणी आहे. पण विरोधक यासंदर्भात दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पाटील यांनी यावेळी केला.

राष्ट्रवादी शेतकऱ्यांसोबत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून, कंपन्यांनी कामगारांना कमी करु नये, अशी सरकारची भूमिका असल्याचं जयंत पाटील यांनी नमूद केलं. केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी विधयेकास राष्ट्रवादीचा विरोध आहे. याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. या विधेयकाविरुद्धच्या लढाईत राष्ट्रवादी शेतकऱ्यांसोबत आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केलं.

टाळेबंदीला मर्यादा

दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत असली तरी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गावपातळी ते महापालिका पातळीपर्यंत सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोरोनाचा प्रभाव नियंत्रणात आणण्यासाठी टाळेबंदी लागू केली तर रुग्णांनाच त्याचा त्रास होतो. अर्थचक्र सुद्धा बिघडते. म्हणून टाळेबंदीस मर्यादा आहेत. सातत्याने तसे केले तर अनेक प्रश्न उद्भवतात. त्यामुळे टाळेबंदी शक्य नाही. त्याऐवजी नागरिकांनी सामूहिक प्रयत्न केले तर कोरोना नियंत्रणात येऊ शकतो, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं.