Nashik Oxygen Leak : नाशिकच्या दुर्घटनेनंतर अजित पवारांनी दिला राज्यातील रुग्णालयांसाठी आदेश, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   नाशिकमध्ये पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत 22 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घटनेची दखल घेत राज्यातील सर्व रुग्णालयांमधील ऑक्सिजन पुरवठा सुरक्षित व सुरळीत ठेवण्याचे व रुग्णालयांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहे.

नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालय येथे ऑक्सिजन गळती होऊन 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे नमूद करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुर्घटनेत मृत्युमूखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

राज्यातील डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ अशी संपूर्ण आरोग्य यंत्रणा रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी जोखीम पत्करुन कोरोना संकटाशी लढत असताना अशी दुर्घटना घडणे अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेची उच्चस्तरिय चौकशी करुन दोषींना निश्चित शिक्षा केली जाईल. यापुढे अशा प्रकारची दुर्घटना घडू नये याची काळजी घेताना राज्यातील सर्व रुग्णालयांमधील ऑक्सिजन पुरवठा सुरक्षित व सुरळीत ठेवण्याचे व रुग्णालयांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे निर्देश अजित पवार यांनी दिले आहे.

नाशिक महापालिकेच्या रुग्णालयातील दुर्घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्र्यांनी नाशिकचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांशी संपर्क साधून दुर्घटनेची माहिती घेतली व अन्य रुग्णांना इतर रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर आवश्यक उपचार करण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या आहेत.