बिअरच्या बिलावरून नाशिकमध्ये पोलिसाचा गुंडाच्या मदतीने बारमध्ये ‘राडा’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – बारमध्ये बिअर घेतल्यानंतर बिलावरून एका पोलीस कर्मचाऱ्याने एका गुंडाच्या मदतीने बार मालकाला मारहाण केली. या घटनेमुळे नाशिक शहरातील पोलीस कर्मचाऱ्यामुळे खाकी वर्दीला कलंक लागला आहे. गुन्हेगारांवर वचक ठेवण्याऐवजी पोलिसच जर गुन्हेगाराच्या मदतीने गुंडगिरी करत असतील तर सर्वसामान्यांनी कुणाकडं दाद मागायची असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

भगवान जाधव असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्याने स्थानिक गुंड पप्पू कांबळे यांच्या मदतीने बार मालकाला मारहाण केली. लेखा नगर येथील हॉटेल स्पॅक्समध्ये पोलीस कर्मचारी भगवान एकनाथ जाधव हा त्याच्या साथीदारासोबत बिअर घेण्यासाठी गेला होता. बिअर घेतल्यानंतर बारचालक भास्कर येतप्पा शेट्टी याने जाधवकडे पैशांची मागणी केली.

मात्र, मी पोलीस असून तुझ्याकडे बघून घेतो असे म्हणत शेट्टी यांना शिवीगाळ केली. एवढेच नाहीतर जाधव याने त्याचा साथीदार गुंड पप्पू कांबळे या दोघांनी शेट्टीला मारहाण केली. या घटनेनंतर बारचालक शेट्टी यांनी आंबड पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. आता नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील अशा प्रकारांना आळा घालतील का ? संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करणार का ? असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.