Nashik : नव्या पोलीस आयुक्तांच्या Letter Bomb मुळं मोठी खळबळ !

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – लॉकडाऊनचे नियम शिथील झाल्यानंतर नाशिक शहरात जुगार, अवैध मद्यविक्री तसंच अवैध प्रवासी वाहतूक प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र कारवाईच्या पार्श्वभूमीवर नवनियुक्त पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या लेटर बॉम्बमुळं मोठी खळबळ उडाली आहे.

जिल्हाधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभागाला (RTO) पत्र पाठवत पोलीस आयुक्तांनी दणका दिला आहे. शहरातील अवैध प्रकाराला आळा घालण्यासाठी स्वतंत्र विभाग असल्याचा दावा पोलीस आयुक्तांनी केला आहे. अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत पोलिसांचा थेट संबंध नाही. त्यामुळं असे प्रकार वाढल्याच्या तक्रारी आमच्याकडे येत असल्यानं संबंधित विभागांना कारवाई करण्याबाबत पत्र दिलं असल्याचं पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी सांगितलं.

जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

शहरात अवैध धंदे सुरू आहेत. अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याचे अधिकार तुम्हाला आहेत असं पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. रोलेट, लॉटरी जुगार यावर तुम्ही कारवाई करणं अपेक्षित आहे. तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला कळवा आम्ही कारवाई करू” असंही पांडे म्हणाले आहेत.

राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांना पत्र

मद्य विक्रीला परवाना देता त्यामुळं अवैध मद्यविक्रीवरोधात कारवाई करण्याचे अधिकारही तुम्हाला आहेत. विनापरवाना मद्य विक्री अवैध विक्री यावर कारवाई करा. तुम्हाला अशक्य असेल तर आम्हाला सांगा असं पोलीस आयुक्त म्हणाले आहेत.

आरटीओला पत्र

अवैध वाहतूक, विनापरवाना प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आणि चालकांवर कारवाई करण्याचे अधिकार तुम्हाला आहेत. सरकारनं कारवाई करण्याचे तुम्हालाही अधिकार दिले आहेत. कारवाई करा. शक्य नसेल तर आम्हाला सांगा आम्ही करू असं पोलीस आयुक्तांनी प्रादेशिक परिवहन विभागाला दिलेल्या पत्रात म्हटलं आहे.