क्या बात है ! ज्यावेळी पोलिस अंगणात येऊन म्हणाले – ‘मुबारक हो तुमको ये शादी तुम्हारी..’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना संसर्गामुळे जमावबंदी आणि संचारबंदी आदेश लागू आहे. जीवनावश्यक व अत्यावश्यक वस्तूंच्या सेवेशिवाय घराबाहेर पडल्यास पोलिसांकडून कारवाई होते. मात्र नाशिकमध्ये अशोकमार्ग परिसरात एका अपार्टमेंट खाली पोलिसांचा ताफा सायरन वाजवत दाखल होतो. अन रहिवाशांच्या काळजात धस्स होते. पण हा ताफा कोणावरती कारवाई करण्यासाठी नव्हे तर चक्क एका नववधू-वराला विवाहाच्या शुभेच्छा देण्यासाठी दाखल झालेला. लगेच पोलिसांच्या वाहनाला असलेल्या ध्वनिक्षेपकावरून ‘मुबारक हो तुमको ये शादी तुम्हारी..’ हे गीत ऐकू येऊ लागत. मग काय सगळे आसपासचे रहिवाशी खिडकी, बाल्कनीत येऊन पोलिसांच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाला टाळ्यांच्या गजराने प्रतिसाद देतात.

लॉकडाऊन काळात सरकारकडून लग्नसमारंभ, धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात येत नाही. नाशिक मधील राहणाऱ्या हरिणी नामक युवतीचा पूर्वनियोजित विवाह ठरलेला होता. मात्र लॉकडाऊन काळात हा विवाह अगदी साधेपणाने घरच्या घरी कोणत्याही प्रकारचा उत्सवी स्वरूप न देता आटोपण्याचा निर्णय वधू-वर पक्षाकडून घेतला. यासाठी नवरदेव थेट गुजरातहून आपल्या बस्त्यासह गुजरात सरकारच्या परवानगीने एकटाच बोहल्यावरती चढायला नववधूच्या घरी पोहचला. हरिणी आणि निकुंज यांनी पारंपरिक वैदिक पद्धतीने घरातच सात फेरे पूर्ण केले. देशातील आरोग्य यंत्रणा व पोलीस प्रशासन खांद्याला खांदा लावून झटत आहे. ‘कोरोनाला हरवायचं मग, आपण घरातच थांबा’ असे कळकळीचे आवाहन सर्व स्तरांतून नागरिकांना प्रशासनाकडून केलं जातयं. त्यामुळे कोरोना अन गर्दीचे घातकी रूपाचे समीकरण टाळायचे असा चंग हरिणी आणि निकुंज या दोघांनी बांधला. यासाठी निकुंजच्या कुटूंबाने आपल्या लाडक्या मुलाच्या विवाहसोहळ्याला व्हिडीओ कॉल वरून उपस्थिती लावून दोघांना शुभाशीर्वाद दिले.

दरम्यान, या साधेपणाने झालेल्या या विवाहाची खबर नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना कळताच त्यांनी एका सहाय्यक आयुक्त अधिकाऱ्यास या नवदाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी पाठविले. लगोलग पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा ताफा घेऊन नववधूंच्या अंगणात दाखल झाले. पोलिसांचा सायरन ऐकू येताच तेथील परिसरात शांतात पसरली. यावेळी नखाते यांनी ध्वनिक्षेपकाद्वारे हरिणी आणि निकुंज यांना बाल्कनीत बोलावून ‘तुम्ही अगदी साधेपणाने विवाह करून सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत, समाजापुढे एक आगळावेगळा आदर्श ठेवला आहे. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आलो आहोत’ असे त्यांनी सांगितले अनं सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.

नववधूच्या डोळ्यांत तरळले आनंदाश्रू
पोलिसांनी जेव्हा ध्वनिक्षेपकाद्वारे मोबाईलमधील ‘तेरे माथे की बिंदीया चमकती रहे, तेरे हाथो की महेंदी महेकती रहे, तेरे जोडे की रौनक सलामत रहे, ‘तेरी चुडी हमेशा खनकती रहे….., मुबारक हो तुमको ये शादी तुम्हारी….’ हे गीत सुरु करताच हरिणीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले, आणि निकुंजने तिला सावरत या दोघांनी टाळ्यांच्या कडकडाटात बाल्कनीत उभे राहून उपस्थित असलेल्या पोलिसांचे आभार मानले.